म्हापशातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाच गट..!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

प्रत्येक आमदार आपल्या पंचायत क्षेत्रामध्ये माटोळीचे बाजाराची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच गणेशभक्तांनी माटोळीचे सामान खरेदीसाठी घराबाहेर न पडता ऑनलाईन माटोळी साहित्य विक्री केंद्र चालू झाली आहे.

म्हापसा: म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील २० प्रभागांसाठी गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशमूर्ती विसर्जनसाठी पाच गट तयार करून संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत तार नदीवर किंवा देव बोडगेश्‍वर मंदिरासमोर तयार करण्यात येणाऱ्या कृत्रिम तळीमध्ये पालिकेतर्फे व्‍यवस्था करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांनी दिली. गणेशचतुर्थीच्या पूर्वतयारी संदर्भात बोलाविलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

नगराध्यक्ष ब्रांगाझा म्हणाले, कुचेली, शेळपे या भागातील लोक कुचेली येथे गणेश विसर्जन करतील, तर करासवाडा व आकय येथील लोक आकय नदीवर तर संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत प्रभाग ९, १०, १३, १९ मधील मरड आंगड, फेअर बायज, केणीवाडा, सिरसाटवाडा, विठ्ठलवाडी, अन्साभाट मधील संध्याकाळी सात ते रात्री आठ या वेळेत प्रभाग ४, १५, १६, १७  व १८ खोर्ली भाग रात्री ८ ते रात्री ९ पर्यंत प्रभाग ५, ६, ११, १२ (आल्त धुळेर, डांगी कॉलनी गणेशपुरी, आल्तीनो दत्तावाडी एकतानगर, लक्ष्मीनगरमधील लोकांसाठी रात्री ९ ते रात्री १० पर्यंत प्रभाग ३, ७, २० मध्ये धुळेर, शेट्येवाडा, पेडे, गावसवाडा या भागातील लोकांसाठी वेळ निश्‍चित केली आहे.

गणेशभक्तांनी आपल्या घराजवळील विहिरींमध्ये किंवा आपल्या घरासमोर कृत्रिम टाकी उभारून विसर्जन करावे. पालिकेला जनतेने सहकार्य केल्यास सामाजिक अंतर ठेवता येईल व सरकारने दिलेल्या नियमांचे पालन होईल असे त्यांनी सांगितले.

यंदा गणेशोत्सवापूर्वी माटोळीचा बाजार म्हापसा बाजाराबरोबर खोर्ली, करासवाडा, धुळेर, राय मनोहर लोहिया उद्यान या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. तसेच आपण मंत्री मायकल लोबो, आमदार ग्‍लेन टिकलो, आमदार नीळकंठ हळर्णकर, आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर या बार्देश मधील आमदाराबरोबर आपण चर्चा केली आहे. प्रत्येक आमदार आपल्या पंचायत क्षेत्रामध्ये माटोळीचे बाजाराची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच गणेशभक्तांनी माटोळीचे सामान खरेदीसाठी घराबाहेर न पडता ऑनलाईन माटोळी साहित्य विक्री केंद्र चालू झाली आहे. अनेक युवापिढीने हा व्यवसाय चालू केल्यामुळे घरपोच माटोळी साहित्य उपलब्ध होणार आहे त्याचा फायदा सर्व गणेशभक्तांनी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष ब्रांगाझा यांनी केले.

 

मंडळांचा ‘यू टर्न’

मागच्या बैठकीत म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विश्‍वस्त अध्‍यक्षांनी म्हापसा बाजार पेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा असेल असे, त्या बैठकीत जाहीर केले. त्यानुसार म्हापसा शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपले गणेशोत्सव दीड दिवस ठेवणार असल्याचे जाहीर केले. पण, आज पुन्हा पालिका इमारतीतील नगराध्यक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव व कोरोनापासून सुरक्षित राहून साजरा करणार असल्याचा दावा विश्‍वस्त अध्यक्षांनी केल्यामुळे नगराध्यक्षांनी भीती व्यक्त केली. म्हापसा गणेशोत्सवाला पोलिस किंवा पालिका सहकार्य करतील की नाही याची शाश्‍वती नाही.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या