मडगाव स्थानकावर पाचशे पोलीस तैनात

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने अनेक परप्रांतीय गोव्यात अडकून पडले आहेत.

सासष्टी, 

टाळेबंदीत गोव्यात अडकून पडलेले परप्रांतीय मजूर व कुटुंबियांची श्रमिक रेल्वेने आपल्या गावी जाण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावर झुंबड उडत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० पेक्षा जास्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे मडगाव रेल्वे स्थानक परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.
परप्रांतीय मोठ्या प्रमाणात अडकून पडलेले असून, या लोकांना सुरक्षित आपआपल्या गावी पोहचविण्यासाठी गोव्यातून श्रमिक रेल्वे सुरू करण्यात येत आहे. गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक मडगाव रेल्वे स्थानकावर जमत असून स्थानकावर नागरिकांची झुंबड होऊ नये, यासाठी सुमारे ५०० च्या वर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने अनेक परप्रांतीय गोव्यात अडकून पडले आहेत. काही परप्रांतीयांनी चालत आपल्या गावी जाण्याचाही प्रयत्न केला. अडचणीत सापडलेल्या या परप्रांतीयांसाठी श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. श्रमिक रेल्वेद्वारे मडगाव रेल्वे स्थानकावरून दिवसाला तीन ते साडेचार हजार नागरिकांना गावी पोहचविण्यात येत आहे. घरी जाण्यासाठी परप्रांतीयांनी स्थानकावर गर्दी न करता, सुरक्षित अंतर ठेऊन रेल्वेत जाण्यासाठी पोलीस तसेच कोकण रेल्वेचे कर्मचारी प्रयत्न करीत आहे.
मडगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून, स्थानकावर येणाऱ्यानी सुरक्षित अंतर ठेवून एका रांगेत ट्रेनमध्ये चढण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यासाठी असलेल्या सर्व प्रवेश द्वारावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. दिवसाला सुमारे तीन हजार परप्रांतीयांना गावी पोचविण्यात असून गावी जाण्यासाठी स्थानकावर जास्त परप्रांतीय जमत आहेत. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काम करीत असून स्थानकावर एकूण तीन पोलीस अधिक्षकांनाही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी दिली.

संबंधित बातम्या