डिचोली तालुक्‍यातील पंचायती अंतर्गत कराराच्या विळख्यात

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

 डिचोली तालुक्‍यातील पंचायती अंतर्गत कराराच्या विळख्यात अडकल्या असून तालुक्‍यातील बहुतेक पंचायतींनी सत्ताबदलाचे नाट्य सुरू आहे.

डिचोली: डिचोली तालुक्‍यातील पंचायती अंतर्गत कराराच्या विळख्यात अडकल्या असून तालुक्‍यातील बहुतेक पंचायतींनी सत्ताबदलाचे नाट्य सुरू आहे. मागील तीन वर्षांत तालुक्‍यातील अठरापैकी चौदा पंचायतींमध्ये सरपंच बदल झाले आहेत. सरपंच बदलाच्या राजकारणात मये-वायंगिणी पंचायत आघाडीवर आहे, तर वन-म्हावळिंगे, मेणकुरे-धुमासे, नार्वे, अडवलपाल आणि हरवळे पंचातीत मात्र सरपंच बदल झालेला नाही. विशेष म्हणजे कोरोना महामारी संकट काळातही काही पंचायतींनी सत्तापालट झालेले आहेत. 

मागील मार्च महिन्यापासून कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. अशा संकट काळात मये-वायंगिणीसह, कारापूर-सर्वण, पिळगाव, आमोणे या पंचायतींनी सत्ताबदल झालेले आहेत. तालुक्‍यात मुळगाव, अडवलपाल, साळ, लाटंबार्से, मेणकुरे-धुमासे, शिरगाव, मये-वायंगिणी, नार्वे, वन-म्हावळिंगे, कारापूर-सर्वण, पिळगाव, आमोणे, न्हावेली, कुडणे, हरवळे, वेळगे, सुर्ल आणि पाळी-कोठंबी या अठरा पंचायतींचा समावेश आहे. 

मये विधानसभा मतदारसंघात समावेश असलेली चोडण-माडेल ही पंचायत वास्तविक तिसवाडी तालुक्‍यात येत आहे. या पंचायतीतही तीनवेळा सरपंच बदल झालेला आहे. अलीकडेच कमलाकांत वाडयेकर यांची या पंचायतीचे नवीन सरपंच म्हणून निवड झाली आहे. सुरवातीस पंढरी वेर्णेकर तर त्यांच्यानंतर शांबा कळंगुटकर यांनी सरपंचपद उपभोगले आहे. 

सत्ताबदलात मये आघाडीवर
सत्ताबदलात मये-वायंगिणी पंचायत आघाडीवर असून या पंचायतीत अस्थिरता असल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यमान सरपंच तुळशिदास चोडणकर हे मागील तीन वर्षांतील या पंचायतीचे पाचवे सरपंच आहेत. सुरवातीस विश्वास चोडणकर नंतर विजय पोळे, कुंदा मांद्रेकर आणि उर्वी मसूरकर यांनी सरपंचपद उपभोगले आहे. उपसरपंचपदही दोनवेळा बदलले आहे. मये-वायंगिणी पंचायती पाठोपाठ कारापूर-सर्वण पंचायतीचा नंबर लागत आहे. मागील तीन वर्षांत या पंचायतीतही चार सरपंच बदलले आहेत. जून २०१७ मध्ये पंचायत निवडणुका झाल्यानंतर रमेश सावंत यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांच्यानंतर लक्ष्मण गुरव, सुषमा सावंत आणि आता उज्वला कवळेकर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. या पंचायतीचे उपसरपंचपदही तीनवेळा बदलले आहे. साळ, न्हावेली, सुर्ल आणि आमोणे पंचायतीत तीनवेळा सरपंच बदल झालेला आहे. याशिवाय लाटंबार्से, मुळगाव, शिरगाव, पिळगाव, पाळी-कोठंबी, वेळगे या पंचायतींतही सत्तापालट झालेले आहेत.
 

संबंधित बातम्या