फोंड्यात पाच जणांना केले कॉरन्टाईन

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले निर्जंतुकीकरण, कोरोना रुग्णांमुळे फोंड्यात धास्ती

फोंडा

फोंड्याशी संबंधित कोरोनाचे रुग्ण सापडल्याने फोंडा परिसरात सध्या खळबळ उडाली आहे. सापडलेले सातही रुग्ण हे गोव्याबाहेरून आलेले असल्याने लोकांनी चिंता करू नये, मात्र काळजी घ्यावी असे प्रशासनाने म्हटले असले तरी फोंडावासीयांच्या मनात सध्या धाकधूक सुरू आहे. दरम्यान, बेतोडा येथे एक ट्रकचालक कोरोनाग्रस्त सापडल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पाचजणांना तपासणीसाठी इस्पितळात पाठवण्यात आले असून कॉरन्टाईन करण्यात आले आहे. या पाचजणांत ढाब्यावरील तिघे तसेच माल खाली केला तेथील वाहतूक कार्यालयाशी संबंधित दोघांचा समावेश आहे.
गुजरातहून आलेल्या ट्रकचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने काल या ट्रकचालकाला इस्पितळात उपचारासाठी दाखल केल्यानंतर  सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनातर्फे बेतोडा बगल रस्ता ज्या ठिकाणी हा ट्रक पार्क करून ठेवला होता, तो परिसर तसेच ट्रक आणि ज्या ढाब्यावर या ट्रकचालकाने पाण्याची मागणी केली तो परिसर सकाळी निर्जंतुकीकरण करण्यात आला.  
फोंड्याचे उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व निर्जंतुकीकरणासाठी आवश्‍यक सूचना केल्या. 
गुजरातहून हा ट्रकचालक बेतोडा औद्योगिक वसाहतीत फर्मास्युटिकल्ससंबंधीचे सामान घेऊन आला होता. या ट्रकचालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने बेतोडा येथे ट्रक थांबवलेल्या ठिकाणी असलेल्या एका ढाब्यावर पाण्याची मागणी केली, मात्र या चालकाची स्थिती पाहून तेथील लोकांनी लगेच रुग्णवाहिकेला पाचारण केले व त्याला फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राज्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता. पण प्रथमच फोंड्याशी संबंधित कोरोना रुग्ण सापडल्याने फोंडावासीय धास्तावला आहे.

ढाबे बंद करा...
फोंडा तालुक्‍यातील महामार्गांवर असलेले ढाबे उशिरापर्यंत सुरू ठेवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी ट्रकचालकांची गर्दी होत असून त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याचे कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी म्हटले आहे. हे ढाबे त्वरित बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगताना संबंधित वाहतूक कार्यालयाला एखाद्या ट्रकचालक अथवा अन्य कुणाचा संशय आल्यास त्यांनी लगेच सरकारी यंत्रणा किंवा पोलिसांना कळवावे. ही कार्यालये संध्याकाळीप पाचपर्यंतच उघडी ठेवावीत. ढवळी परिसरातही हा प्रकार सुरू असून लगतच्या इमारतीतील लोकांनाही असा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी पंचायत किंवा पोलिसांना कळवावे असे राजेश कवळेकर यांनी म्हटले आहे. 

बेतोडा भागातही धास्ती...!
बेतोडा मुख्य रस्त्यावरच कोरोनाबाधित ट्रकचालक सापडल्याने बेतोडा भागात भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी सरकारी यंत्रणेने आवश्‍यक खबरदारी घ्यावी अशी मागणी बेतोडा पंचायतीचे सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य व इतर पंचांनी केली आहे. लोकांत घबराट पसरली असल्याने याप्रकरणी आवश्‍यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे तसेच संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करून कॉरन्टाईन करणे आवश्‍यक असल्याचे सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या