डिचोलीत पाच पोलिस पॉझिटिव्ह; सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांचे अर्धशतक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

तिसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने अर्धशतक पार केल्याने तालुक्‍यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे

डिचोली: मागील तीन दिवसांपासून डिचोलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असून, पोलिस स्थानकाशी संबंधित एका पोलिस उपनिरीक्षकासह पाच पोलिस पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. एकाचवेळी पाच पोलिस बाधित आढळून आल्याने पोलिस स्थानकातील अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्ये चिंता पसरली असून, या पोलिसांच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब चाचणी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, डिचोली तालुक्‍यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनोबाधित रुग्णांच्या आकड्याने अर्धशतक पार केले आहे. 

आज बुधवारी एकाच दिवसात मये विभागात २४,  डिचोली विभागात २१ आणि साखळी विभागात ०७ मिळून तालुक्‍यात तिसऱ्या दिवशी ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.तिसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने अर्धशतक पार केल्याने तालुक्‍यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मये विभागात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. आज एकाच दिवसात मये विभागात २४ रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारपर्यंत तालुक्‍यात कोरोनाचे ४२२ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. 

डिचोली मतदारसंघातील ११५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ८० रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. साखळी मतदारसंघातील १३३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ८१ रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. 

मये मतदारसंघातील १७४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४८ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर १२५ रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर मये आणि डिचोली विभागातील प्रत्येकी एक आणि साखळी विभागातील दोन मिळून चार रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या