तुडवमध्‍ये पाच वीजखांब जमिनदोस्त

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

वीज कर्मचाऱ्यांनी पर्यायी व्‍यवस्‍था केल्‍याने स्‍थानिकांनी मानले आभार

सांगे: ऐन गणेश चतुर्थी सणाच्या दिवशी तुडव नेत्रावळी गावातील लोकवस्तीत पाच वीजखांब मोडून पडण्याची घटना घडली. सुदैवाने कोणालाही इजा, दुखापत झाली नाही. चतुर्थी दिवशीच वीज कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वीजपुरवठा केल्‍याने स्‍थानिकांनी व नेत्रावळीचे उपसरपंच अभिजित देसाई यांनी नेत्रावळी वीज कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी वादळी पावसाच्या तडाख्यात तुडव गावासाठी जोडणाऱ्या वीज वाहिन्यांवर झाडे तुटून पडले. या झटक्याबरोबर एका रांगेत असलेले भर लोकवस्तीतील पाच विजेचे खांब मोडून पडले. सुदैवाने कोणत्याही घराला धोका उत्पन्न झाला नाही. त्‍या रात्री संपूर्ण गाव अंधारात होता. चतुर्थीच्या दिवशी नेत्रावळीतील वीज कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत तुडववासियांना पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करून दिला. 

मोडलेले खांब उभे करण्यासाठी उशीर लागणार असल्यामुळे केबलद्वारे गावात वीज उपलब्ध करून देण्यात आला. गावात चतुर्थी आणि घरात गणपती बाप्पा येणार असल्यामुळे मोठ्या विघ्नातून गणरायाने सर्वांना संकटातून सावरल्याचा भावना स्थानिकांनी व्‍यक्‍त केल्‍या. वीजपुरवठा सुरळीत करून देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.

संबंधित बातम्या