साळ गावावर पुराचे संकट?

तुकाराम सावंत
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

गेल्या चार-पाच दिवसापासून रौद्रावतार धारण केलेला पाऊस, त्यातच तिळारी धरणातील जलविसर्ग यामुळे डिचोली तालुक्‍यातील साळ गाव पुराच्या वेढ्यात अडकला आहे

डिचोली,

गेल्या चार-पाच दिवसापासून रौद्रावतार धारण केलेला पाऊस, त्यातच तिळारी धरणातील जलविसर्ग यामुळे डिचोली तालुक्‍यातील साळ गाव पुराच्या वेढ्यात अडकला आहे. तिळारी धरणातून सोडलेले पाणी यामुळे दुपारी शापोरा नदीबाहेर फुटून गावात घुसून, सकल भाग जलमय झाला. सायंकाळपर्यंत पाणी वाढल्याने गावात मोठा हाहाकार माजला. गावात घुसलेले पाणी रात्री हळूहळू ओसरत होते. तरी रात्रभर पावसाचा जोर आणि तिळारीतून पाण्याचा जलविसर्ग चालूच राहिल्यास साळ गावात मागील वर्षीची पुनरावृत्ती घडून, पुन्हा पुराचा तडाखा बसण्याची शक्‍यता आहे. तशी भीतीही साळवासीयांमध्ये पसरली असून, नागरिकांच्या काळजाची धडधड वाढली आहे. रात्री परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी गावातील लोक भितीच्या सावटाखाली आहेत. गावाला पाण्याने वेढल्याने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गावाला बसलेल्या पुराच्या तडाख्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पुराचा धोका ओळखून गावात आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. गावाला पाण्याने वेढले असले, तरी बुधवारी रात्रीपर्यंत मोठा अनर्थ घडला नसल्याचे वृत्त आहे.

मंदिर, घरे पाण्याखाली !
जोरदार पाऊस काल मंगळवारी सायंकाळपर्यंत साळ गावातील परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र काल रात्रीपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी सकाळी शापोरा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली. त्यातच महाराष्ट्रातील तिळारी धरण तुडूंब भरल्याने धरणातील पाणी शापोरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत शापोरा नदीतील पाणी बाहेर फुटून साळ गावात घुसले. सायंकाळपर्यंत गावातील श्री भूमिका मंदिर तसेच दोन-तीन घरांनी पाणी घुसल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी शापोरा नदीकिनाऱ्यावरील जलस्त्रोत खात्याच्या पंपघरासह बंधाऱ्यावरील पदपूलही पाण्याखाली आला. खालचावाडा परिसर जलमय झाला असून, शेती, बागायती पाण्याखाली आल्या आहेत. सायंकाळपर्यंत गावात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती..दुर्दैवाने गावात पुराचा तडाखा बसलाच, तर शासकीय यंत्रणा, पंचायत मंडळासह सामाजिक कार्यकर्ते मेघ:श्‍याम राऊ त आदी नागरिक सतर्क झाले आहेत.

आपत्कालीन यंत्रणा तैनात !
मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी साळ गावाला भेट देवून तेथील पूरसदृष्य स्थितीचा आढावा घेतला. रात्रीच्यावेळी संकट ओढवलेच तर, मदतकार्य करण्यासाठी खलाशांसह यांत्रिकी बोट तैनात करण्यात आली आहे. आवश्‍यक यंत्रसामग्रीसह डिचोली अग्निशमन दलाचे जवानही साळ गावात तैनात करण्यात आले आहेत. आपत्तकालीन संकटावेळी मदतकार्य करण्याचे आदेश मामलेदार श्री. पंडित यांनी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत.. सतर्क राहण्याची सुचनाही मामलेदारांनी आपत्कालीन यंत्रणेसह नागरिकांनाही केली आहे.

सभापतींची धाव!
साळ गावाला पुराने वेढल्याचे समजताच, डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी साळ गावात धाव घेतली. त्यांनी जलसंपदा खात्याचे अभियंते के.पी.नाईक, सरपंच घन:श्‍याम राऊ त, उपसरपंच वर्षा साळकर आदी पंच तसेच नागरिकांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनीही साळ गावात जावून तेथील जलमय स्थितीचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या