खडकाळ जमिनीवर फुलवली शेती

संजय घुग्रेटकर
सोमवार, 27 जुलै 2020

खडकाळ जमिनीचा वापर व्हावा, हा विचार सतत मनात येत होता. हा विचार प्रत्यक्षात उतरावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून खांडोळ्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने स्वतः कष्ट घेऊन डोंगराला पाझर फुटावा, अशा रितीने खडकाळ जमिनीत शेती फुलविण्याचा आदर्श ठेवला आहे.
तामसुली परिसरात पर्यावरणप्रेमी तथा शेतकरी मधू गावकर (मधू भाई) यांनी खडकाळ जमिनीवर माती टाकून भाजी लागवडीसाठी जमीन तयार केली.

खांडोळा,

खडकाळ जमिनीचा वापर व्हावा, हा विचार सतत मनात येत होता. हा विचार प्रत्यक्षात उतरावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून खांडोळ्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने स्वतः कष्ट घेऊन डोंगराला पाझर फुटावा, अशा रितीने खडकाळ जमिनीत शेती फुलविण्याचा आदर्श ठेवला आहे.
तामसुली परिसरात पर्यावरणप्रेमी तथा शेतकरी मधू गावकर (मधू भाई) यांनी खडकाळ जमिनीवर माती टाकून भाजी लागवडीसाठी जमीन तयार केली. पाऊस पडताच त्यांनी या ठिकाणी भेंडीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. दोन प्रकारची भेंडीची बियाणे रुजवली असून आता त्या ठिकाणी उत्तम प्रकारे भेंडीची झाडे आली आहेत. काही झाडांना फुलेही येत आहे. भेंडीचे पीक हे पूर्णतः सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आले आहे.
टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. पण, याच संधीचे सोनं करण्याच्या निश्‍चयाने मधू गावकर यांनी खडकाळ जमीन शेतीलायक बनवली. मधू गावकर यांनी मार्च, एप्रिल, मे महिन्यात कष्टाने खडकाळ जमिनीवर माती टाकण्याचे काम सुरू केले. खडतर प्रयत्नाने खडकाळ जमीन पिकाऊ बनवली. याच जमिनी गेल्या दोन वर्षापूर्वी काही काजूची रोपटी लावली होती. तिही आता चांगल्याप्रकारे वाढली आहेत. या रोपट्याच्या मधल्या भागात यंदा माती टाकून भेंडीचे पीक घेतले आहे. ‘शेतकऱ्याने प्रयत्न केले, तर तो सोनेही पिकवू शकतो’ या विचाराप्रमाणेच कष्टाची जोड देऊन भेंडीचे पीक घेण्यात आले. सध्या या भेडींच्या झाडांना पिवळी फुले यायला सुरवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसात चांगल्याप्रकारे भेंडीचे पीक निश्चितपणे मिळणार असल्याचे मधू गावकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, भेंडीच्या झाडांची योग्य देखभाल करण्यात येत असून कोणत्याही इतर खताचा वापर केला नाही. संपूर्णपणे सेंद्रीय खताचा वापर केला आहे. त्यामुळे आरोग्यासाठी ही उत्तम भाजी मिळणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या जमिनी आहेत, पण त्या पडीक आहेत. तेथेही वेगवेगळ्या भाज्या पिकवता येतात. युवकांनी शेतीकडे वळावे. आपली शेती पिकली तर बाहेरील भाजीवर अवलंबून राहणे थांबेल.

संपादन ः संदीप कांबळे

रानटी डुकरांचा त्रास
रात्रीच्या वेळी या परिसरात रानटी डुकरांचा वावर असतो. प्रत्येक वर्षी डुकरांकडून भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या दोन दिवसापूर्वी डुकरांनी काही प्रमाणात नासधूस केली. तात्पुरत्या कुंपनाची व्यवस्था केली असून, रानटी डुकरांपासून घेतलेले पीक वाचावे यासाठी रात्रीही जागावे लागत असल्याचे शेतकरी मधू गावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या