झाडावर चढुन नारळ काढणारा ‘फ्लाय कोकोबोट’...

coconut tree.jpg
coconut tree.jpg

पणजी: सध्या गोव्यात माडावर चढून नारळ काढणारे ‘पाडेली’ कमी झाले आहेत. त्‍यामुळे नारळ कसे काढायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी खात्याने माडावर चढण्याच्या यंत्राचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. आता ‘फ्लाय कोकोबोट’ या ड्रोनसदृश उपकरणाच्या साहाय्याने माडावरील नारळ काढण्याची संकल्पना पुढे आली असून त्‍यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकणार आहे. (Fly Cocobot was invented to break coconuts in goa)

या उपकरणाच्या आधारे वाजवी दरात नारळ काढणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे नारळ काढण्यासाठी माडावर चढल्यावेळी अपघात होण्याचा धोकाही राहणार नाही. जुने गोवे येथील ‘आयसीएआर-सीसीएआरआय’ आणि गोवा विद्यापीठ येथील तज्ज्ञांनी सदर संकल्पना पुढे आणली आहे. याअंतर्गत ड्रोनसदृश उपकरण माडावर जाऊन त्याच्या बुंध्याला पकडेल. त्यानंतर त्यात कापण्यासाठी जी सुविधा दिलेली आहे, ती खुली होईल आणि त्याद्वारे नारळाची पेंड कापली जाईल. ही सारी प्रक्रिया रिमोट‌ नियंत्रित मॉड्युलच्या पडद्यावर लाईव्ह व्हिडीओच्या रूपाने पाहायला मिळेल आणि त्यामुळे कुठले नारळ कसे कापून काढायचे हे ठरवता येईल. 

ताशी 12 ते 15 माडांचे नारळ काढण्‍याची क्षमता

या संकल्पनेची राष्ट्रीय स्तरावर भरपूर वाखाणणी झालेली असून आता या उपकरणासाठी पेटंट मिळवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. सदर उपकरण रिमोटद्वारे नियंत्रित केले जाते आणि त्यामुळे सुरक्षित अंतरावर राहून नारळ काढता येतात. या  उपकरणाच्या आधारे नारळ काढण्याचे काम पुरुषाप्रमाणे महिलाही करू शकतात. या उपकरणाची क्षमता ताशी १२ ते १५ माडांवरील नारळ काढण्याची असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

‘फ्‍लाय कोकोबोट’ला पाच लाखांचेही बक्षीस
सध्या ‘आयसीएआर-सीसीएआरआय’ आणि गोवा विद्यापीठ यांनी संयुक्तपणे या उपकरणाच्या आराखड्याच्या पेटंटसाठी अर्ज केलेला आहे. ‘आयसीएआर’च्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, 2020च्या खाली कृषी तांत्रिक ज्ञानासंबंधी उपक्रम राबविण्यात आला होता. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला चालना देणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यात देशभरातून 784  पथके सहभागी झाली होती. त्यात वरील उपकरण गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक राजेंद्र गाड यांच्यासमवेत ‘आयसीएआर- सीसीएआरआय’मधील प्रमुख वैज्ञानिक (फलोत्पादन) अदवी राव देसाई आणि विद्यार्थी अभिराज पेडणेकर व अरमान शेख यांनी सादर केले होते. हे ‘फ्लाय कोकोबोट’ उपकरण पहिल्या बक्षिसासाठी पात्र ठरून त्याला पाच लाख रुपये व प्रमाणपत्र प्राप्त झाले.

बहुपयोगी वापर
काहीवेळा माडावर आंतरपीक म्हणून मिरीची लागवड केली जाते. अशा माडांवरील नारळ काढण्यास सहसा पाडेली तयार नसतात. मात्र, या उपकरणाच्या आधारे आंतरपीक घेतलेल्‍या माडांवरील नारळही सहजपणे काढता येतील. या उपकरणाचा उपयोग तेलताड, खजूरसारख्या झाडांवरही करता येतो आणि त्याच्यात बदल घडवून फवारणी वा छाटणी करण्यासाठीही त्याचा वापर करता येतो.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com