गोमंतकीय विनायक खेडेकर यांना पद्मश्री

गोमंतकीय विनायक खेडेकर यांना पद्मश्री
Folk researcher from Goa Vinayak Khedekar received Padma Shri award

पणजी :  लोककला व लोकसंस्कृती या क्षेत्रात बहुमूल्य असे संशोधनात्मक कार्य करून अपूर्व असे योगदान दिलेले गोमंतकीय बुजुर्ग लेखक, संशोधक विनायक विष्णू खेडेकर यांना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.सावईवेरे येथे 1938 मध्ये जन्मलेल्या खेडेकर यांनी  लौकिकार्थाने शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही. गुरुकुल पद्धतीने संस्कृत, वैदिक अध्ययन केले. यजमानाच्या घरचे पौरोहित्य, यज्ञयागात सहभाग दिला शिवाय ज्योतिष, कीर्तन यातही रुची होती, त्याही कला त्यांना अवगत होत्या. पत्रकार म्हणूनही त्यांनी सुरवातीच्या काळात काम पाहिले होते. गोमन्तकसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील दैनिके व नियतकालिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. लोककला व लोकसंस्कृती यासाठी त्यांचे भरीव योगदान आहे आणि त्याची दखल भारत सरकारने घेतली आहे.

परदेशात भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधित्वही  केले.त्यात ताश्कंद(एक महिना) सहआशियाखंडातील रशिया, न्यूयॉर्क व दक्षिण अमेरिकेतील देशांचा समावेश होता. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाची रिसर्च फेलोशिप त्यांना प्राप्त झाली.भारत सरकारची विविध मंत्रालये, विभागीय सांस्कृतिक केंद्रे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय नाट्य विद्यालय(एनएसडी), इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, प्रसार भारती, अशा संस्थांच्या समित्यांवर सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
फोर्ड फाऊंडेशन, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, केंद्रीय साहित्य व संगीत नाटक अकादमी अशा संस्थांच्या परिषदा, चर्चासत्रात जाणकार वक्ता म्हणून त्यांनी सहभाग देऊन सादरीकरणही केले आहे. लोककला व लोकसंस्कृती या विषयावरील संशोधनात्मक ग्रंथांसह त्यांची सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विनायकराव राज्य सांस्कृतिक पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, कृष्णदास शामा यासह महाराष्ट्र राज्य, कला अकादमी, गोमंतक मराठी अकादमी यांच्या साहित्य पुरस्कारांनी विभूषित आहेत.

स्वरगंधा, ड्रम्स ऑफ गोवा, लोकरंग, मंदिर उत्सव अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची संकल्पना व सादरीकरण त्यांचे होते. गोमंत गणेश, घुमट उत्सव, दायज, मंदिर संगीत अशा सात कमर्शिअल ध्वनीफिती व सीडिंची संकल्पना त्यांची होती. गोवा कला अकादमीच्या स्थापनेपासून २३वर्षे त्यांनी सदस्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली व 1996 साली निवृत्त झाले.श्री. खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अभिनंदन केले आहे. माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्‍यांनी साहित्‍य शिक्षणाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला होता, असे तानावडे यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com