महामारीत हरमलमध्ये विदेशी पर्यटकांचा संचार

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

जगभरात व गोव्यात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असल्याने स्थानिक लोकांत भीती पसरली आहे. मात्र गोव्यात त्याच महामारीमुळे अडकलेले विदेशी पर्यटक अजूनही मौजमजेच्या धुंदीत असून मास्क व सामाजिक अंतराचे पालन करीत नसून मुक्त व बेफिकीरपणे वागत असल्याने, त्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हरमल: जगभरात व गोव्यात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असल्याने स्थानिक लोकांत भीती पसरली आहे. मात्र गोव्यात त्याच महामारीमुळे अडकलेले विदेशी पर्यटक अजूनही मौजमजेच्या धुंदीत असून मास्क व सामाजिक अंतराचे पालन करीत नसून मुक्त व बेफिकीरपणे वागत असल्याने, त्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान परवा झुझु नामक एका पर्यटकास कोरोनाची बाधा झाल्याने इस्पितळात दाखल केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या किती पर्यटकांची तपासणी झाली हे कळण्यास मार्ग नसल्याने त्याना घरातच विलगीकरण करण्याचा आदेश काढावा व आरोग्य खात्याने परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मागणी पंच प्रविण वायंगणकर यांनी केली आहे.

सध्या विदेशी पर्यटक मान्सून पर्यटन हंगाम अनुभवत आहेत. कित्येकांचे वास्तव्य पाच महिन्यांपेक्षा अधिक झाल्याने त्यांच्याकडील पुंजी संपली आहे त्यामुळे आपल्या मित्रमंडळींच्या गराड्यात राहून एकत्रितपणे चहापान, जेवणे उरकीत असल्याचे दिसून येते. मात्र याठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही शिवाय मास्कचा वापर मुळी होतच नसल्याने पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी पंच वायंगणकर यानी केली आहे.

त्यांनी वाटले होते मोफत मास्क...
लॉकडाऊन काळात सदरहू कोविडबाधित झुझु नामक पर्यटकाने मित्राच्या सहकार्याने स्वखर्चाने सर्वाना मोफत मास्कचे वाटप केले होते व त्याचा विदेशीकडील संपर्क दांडगा असल्याने आरोग्य खात्याने तपासणी व त्या भागाची निर्जंतुकीकरण करण्याची पावले उचलावीत अशी मागणी नागरिक व व्यावसायिकातून होत आहे.झुझु हा जर्मनी देशांतील असून दरवर्षी हरमलात त्याचे वास्तव्य असते.त्याला थोडी थोडी कोंकणी व हिंदी भाषा अवगत असल्याचे समजते.

''त्या'' महितीपासून पंचायती अनभिज्ञ...
किनाऱ्यावर पर्यटकांची भटकंती चालूच असून घोळक्यात बसून व नंतर लोकवस्तीत फिरणारे व गेस्ट हाऊसेसमध्ये परतणारे पर्यटक कोविडबाधित असू शकतात, असे मत पंच वायंगणकर यांनी व्यक्त केले. सध्या विदेशी पर्यटक हरमल गावासाठी डेंजर झोन होण्याची भीती त्यानी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री ''भिवपाची गरज ना'' असे सांगून थकले असावे, सध्या गावागावांत ''भिवपाची शक्यता'' नाकारता येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरकार व आरोग्य खात्याने, कोरोनाबाधित रुग्णाची माहिती त्या-त्या गांवातील सरपंच, पंचांना दिली जाईल असे जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्षात ''ठणठणाट'' असल्याचे पंच वायंगणकर यांनी सांगितले. 

नागरिक भयभीत...
सद्यस्थितीत विदेशी पर्यटक लोक पावसात अनेकदा भिजत गाड्या हाकतात तर पायी चालत असतात.अशांना हिंवतापाची लक्षणे असण्याची शक्यता असून आरोग्य खात्याने त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात.कित्येक जण सध्या खालचावाडा भागांत जाणे टाळत असून टॅक्सी रिक्षा व्यावसायिक विदेशींना गाड्यात बसवण्यास राजी होत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तरी आरोग्य खात्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विदेशी पर्यटकांची मोफत तपासणी करून त्यांना दिलासा द्यावा व स्थानिकांची भीती दूर करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या