भूमिपुत्रांच्या पिळवणुकीचे वन खात्याचे षडयंत्र

Bhmiputra
Bhmiputra

वाळपई

सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागातील परिसरात असलेले जंगल हे अनेक वर्षांपासून गावातील लोकांनी शाबूत ठेवले आहे. गावातील लोक काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत आले आहेत. पोर्तुगीज शासनावेळी देखील जमिनींच्या बाबतीत न्याय मिळाला होता. त्यावेळी लोकांच्या उत्पन्नाच्या जमिनी सोडून दूरवरचा परिसर हा जंगलमय ठेवला होता. जंगलाला कोणतीही बाधा पोचणार नाही याची काळजी लोक घेत होते, पण गोवा मुक्तीनंतर मात्र सत्तरी तालुक्यातील भूमिपुत्रांची खरी शोकांतिका उदयाला आली आहे. वन खात्याने बळजबरीने लोकांच्या जमिनीवर कब्जा करीत जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातून गेल्या काही वर्षांपासून लोक व वन खाते यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. आता तर वन विभाग भूमिपुत्रांची पिळवणूक करण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करून लोकांवर खोटे गुन्हे लादण्याचे मोठे षडयंत्र रचविले जात आहे, असा आरोप सत्तरी तालुका भूमिपुत्र संघटनेने वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, पदाधिकारी आंतोनियो पिंटो, बातू गावडे, रामचंद्र नाईक, अर्जुन गावडे, सहदेव गावडे, ज्ञानेश्वर नाईक, राजाराम गावडे, वासू केरकर उपस्थित होते. हरिश्चंद्र गावस म्हणाले, पोर्तुगीज काळापासून करंझोळ, कुमठळ गावात लोक वास्तव्य करून आहेत. तरी देखील गोवा मुक्तीनंतर मात्र वन खात्याने आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. लोक काजू बागायतीत कामासाठी जातात. त्यावेळी वन खात्याचे कर्मचारी येऊन सतावणूक करीत आहेत. सरकारने १९९९ साली म्हादई अभयारण्य घोषित केले, पण त्याच्या निश्चित सीमा केलेल्या नाहीत. सर्वेक्षणाचे कामच केलेले नाही. परंतु म्हादई अभयारण्याच्या नावाखाली लोकांना वेठीस धरले जात आहे. गावातील मंदिरे देखील म्हादई अभयारण्यात समाविष्ट केली आहेत. करंझोळ, कुमठळ गावात लोक वन खात्यामुळे त्रस्त बनले आहेत. म्हणूनच वन खात्याने करंझोळ गावात पाऊल ठेऊ नये, नाहीतर प्रचंड आंदोलन होऊन होणाऱ्या परिणामांना वन खाते जबाबदार असेल.
रामचंद्र नाईक म्हणाले, की करंझोळ, कुमठळ गावात अनेक पिढ्यांपासून लोकांचे वास्तव्य आहे, पण वन खात्याच्या सतावणुकीमुळे तेथील लोकांना आता जगणे मुश्कील झाले आहे. सहदेव गावडे म्हणाले, पूर्वी लोक शेती करीत होते. त्यावेळी रानटी जनावरे येत नव्हती. रानटी प्राणी पाहणे दुर्मिळच होते. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर येऊन वन्यप्राणी पिकाची नासाडी करीत आहेत. याला जबाबदार सरकार व वन खातेच आहे.
बातू गावडे म्हणाले, वन खात्याने लोकांच्या जमिनी हडप केल्या व ते आपला अधिकार सांगत आहेत. वनराई ही लोकांनी राखली आहे, पण वन खात्याने आवश्यक असलेली झाडे तोडली व आकेशियासारखी निरुपयोगी झाडे लावली आहेत. त्याचा फटका लोकांना बसलेला आहे. आंतोनियो पिंटो म्हणाले, सत्तरी तालुक्यात जमीन मालकी विषय धगधगत आहे. सरकारला ग्रामीण लोकांचे काहीच पडलेले नाही. उलट सरकार नेहमीच वन खात्यामार्फत भूमिपुत्रांची सतावणूक करीत आहे. करंझोळसारख्या अतिशय दुर्गम भागातील लोकांच्या जमिनी हडप केल्या आहेत. कष्टकरी लोकांच्या जमिनी गावकार पध्दतीने कायद्याव्दारे दिल्या पाहिजे, पण तसे न करता उलट खोट्या तक्रारी दाखल करून करंझोळमधील लोकांची सतावणूक केली जात आहे. जंगलाला कोणी आग लावत नाही, पण जंगलांना आग लोक लावतात असे सांगून लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. करंझोळ गावाजवळील म्हादईच्या डोंगरातील झाडांची कत्तल करून आग लावली म्हणून दोघांवर विनाकारण गुन्हे दाखल करून त्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com