वनखाते करणार ड्रोनमधून निगरानी

Avit bagale
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

वन खात्याने घनदाट जंगलात वन्यप्राणी आणि शिकारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या कॅमेऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्याचे ठरवले आहे. सध्या काही भागात ड्रोन कॅमेऱ्यांतून नजर ठेवणे वन खात्याने सुरू केले आहे.

अवित बगळे

पणजी :

वन खात्याने घनदाट जंगलात वन्यप्राणी आणि शिकारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या कॅमेऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्याचे ठरवले आहे. सध्या काही भागात ड्रोन कॅमेऱ्यांतून नजर ठेवणे वन खात्याने सुरू केले आहे.
खोतीगाव अभयारण्य परिसरात शिकाऱ्यांना वन खात्याने पकडल्यानंतर खात्याने जंगल परिसरात वावरणाऱ्यांवर नजर ठेवणे सुरू केले आहे. त्यातच वाघांची संख्या घटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याने वन खात्याने वन्यपशूंवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणे सुरू केले आहे. जंगलात अनेक ठिकाणी वन खात्याने स्वयंचलित कॅमेरे बसवले आहेत. मात्र, दाट जंगलात असे कॅमेरे बसवण्यासाठी जाणे, त्यात टिपलेली छबी तपासण्यासाठी जाणे जिकरीचे असते. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यांतून नजर ठेवण्याचा पर्याय वन खात्याने स्वीकारला आहे.

वाघाच्‍या वास्‍तव्‍याचा अभ्‍यास
गोव्यात वाघाच्या वास्तव्याची एखादीच खूण पूर्वी आढळली, तरी किमान सहा वाघांचा संचार गोमंतकीय जंगलात असल्याचे पुरावे वन खात्याला सापडले होते. त्याची आता खातरजमा करण्यात येत आहे. गुळेली परिसरात वाघाची गुहा सापडल्यानंतर तो वाघ कर्नाटकातील भीमगड भागातून गोव्यात येतो आणि तेथील २५ चौरस किलोमीटरात त्याचा वावर असल्याची माहितीही वन खात्याने संकलित केली आहे.

दुसऱ्या वाघाचा वावर मोले येथील भगवान महावीर अभयारण्याशेजारील जंगलात दीड किलोमीटर अंतरात आहे. तेथील पाच चौरस किलोमीटर परिसरात या वाघाचा संचार असल्याचे पायांचे ठसे, विष्ठा यावरून दिसून आले आहे.

तिसरा वाघ सिमेलगत अनमोड परिसरात सनसेट पॉईंट भागात आहे.

कुळेतही वाघाचे आढळले ठसे
काही दिवसांपूर्वी कुळे रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावरील दाट जंगलात गव्या रेड्याला ठार केले होते. त्या गव्याचे अवशेष सापडले होते. त्याभोवती वाघाचे ठसे मिळाले. तो वाघ तेथे सध्या असल्याचे पुरावेही वनखात्याच्या हाती आले आहेत. याचप्रमाणे दक्षिण गोव्यातही दोन वाघांचा वावर असल्याची माहिती वन खात्याने संकलीत केली आहे. या साऱ्या माहितीची खातरजमा ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने करण्याचा वन खात्याचा विचार आहे.

संपादन : महेश तांडेल

 

संबंधित बातम्या