गोव्याचे माजी रणजीपटू प्रसाद आमोणकर यांचे निधन

Prasad Amonkar
Prasad Amonkar

पणजी : गोव्याचे (Goa) माजी रणजी क्रिकेटपटू (Former Ranji Cricketer) प्रसाद आमोणकर (Prasad Amonkar) यांचे बुधवारी निधन झाले. ते कोरोना विषाणू बाधित होते. गोमंतकीय क्रिकेट वर्तुळात प्रेसी या टोपणनावाने ओळखले जात व मृत्यूसमयी ते 56 वर्षांचे होते.

प्रसाद यांचे सहकारी, गोव्याचे माजी कर्णधार प्रशांत काकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे उपराचारादरम्यान त्यांचे इस्पितळात निधन झाले. ते काकोडे यांचे शेजारी होते. पणजीजवळील शंकरवाडी-ताळगाव येथे त्यांचे निवासस्थान होते. राज्य पातळीवरील त्यांनी मडगाव क्रिकेट क्लब (एमसीसी) आणि नंतर चौगुले स्पोर्टस क्लबचे प्रतिनिधित्व केले.सलामीचे शैलीदार फलंदाज असलेले प्रसाद गोव्यातर्फे 22 रणजी करंडक सामने खेळले. त्यात चार अर्धशतकांच्या साह्याने 778 धावा केल्या. याशिवाय ते 3 प्रथम श्रेणी एकदिवसीय सामनेही खेळले. 1988-89 मोसमात त्यांनी पदार्पण केले, तर 1994-95 मोसमात शेवटचा रणजी सामना खेळले.

ते तंदुरुस्त होते, नियमित सायकलिंग करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागण बाधा झाली. त्यानंतर प्रकृती खालावली, असे काकोडे यांनी नमूद केले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

कुटुंब क्रिकेटमय
प्रसाद, त्यांचे बंधू प्रणीत व प्रशांत हे सुद्धा क्रिकेटपटू होते. तिघेही बंधू एकाच कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धांत खेळले. त्यानंतर पुतण्या सुमीरन याने काका प्रसाद यांच्याप्रमाणे गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले, सध्या तो गोव्याच्या रणजी संघाचा हुकमी सलामीवर आहे. सुमीरन याचा भाऊ शिवम हा सुद्धा गोव्याकडून वयोगट क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com