माजी आमदारांनी नारळ फोडण्याची कामे केली

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

पणजीच्या माजी आमदाराने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लोकहिताची कामे हाती घेतली असती, तर पणजीत विकास दिसला असता. परंतु त्यांना केवळ नारळ फोडून उद्घाटने करण्याची मोठी हौस होती. परंतु नारळ फोडल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्याचे त्यांनी काही पाहिले नाही, अशी टीका कोणत्याही माजी आमदारांचे नाव न घेता महापौर उदय मडकईकर यांनी केली. 

पणजी : पणजीच्या माजी आमदाराने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लोकहिताची कामे हाती घेतली असती, तर पणजीत विकास दिसला असता. परंतु त्यांना केवळ नारळ फोडून उद्घाटने करण्याची मोठी हौस होती. परंतु नारळ फोडल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्याचे त्यांनी काही पाहिले नाही, अशी टीका कोणत्याही माजी आमदारांचे नाव न घेता महापौर उदय मडकईकर यांनी केली. 

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) संचालक मंडळावर आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर म्हणून झालेल्या निवडीनंतर यापूर्वीच्या आयपीएससीडीएलच्या कामांवर आपण प्रश्‍न उपस्थित केल्याची आठवण पत्रकारांनी महापौर मडकईकरांना करून दिली. त्यावेळी त्यांनी वरील टीका केली. शिवाय ते म्हणाले की, केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी ३०० कोटी दिल्याचे आपल्या वाचनात आले होते. आम्ही सुरुवातीला १८० कोटी रुपये खर्च करून जे सीसीटीव्ही लावण्याचे काम आयपीएससीडीएलने हाती घेतले होते, त्यास आम्ही विरोध केला होता. त्यामुळे १८० कोटींच्या सीसीटीव्ही बसविण्याचे काम बंद झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे जुन्या इमारतीचे सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले जाणार होते, त्यासही आम्ही आक्षेप घेतल्याने ते काम मागे पडले. याच २० कोटी रुपयांत आम्ही सुसज्ज मासळी मार्केट उभे केले असते, पण तसे झाले नाही. माजी आमदारांनी केवळ नारळ फोडण्याची कामे केली, पण आमदार मोन्सेरात हे ताळगावचे आमदार असतानाही कधी नारळ फोडण्याची कामे केली नाहीत. तर ती कामे सुरू करून पूर्ण केली.

मागील पोटनिवडणुकीच्या अगोदर नारळ फोडण्याचे काम माजी आमदार व इतरांनी केले. आम्ही कामे करू इच्छितो, कारण विकासकामे करणे महत्त्वाचे आहे. केवळ नारळ फोडून चालणार नाहीतर लोकांच्या समस्या साडविणारे प्रकल्प निर्माण करणे आवश्‍यक असल्याचे महापौर यांनी नमूद केले.

महापालिकेने मास्क न वापरण्याऱ्यांवर एक महन्यापूर्वी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. आपण स्वतः एक महिना कार्यालयात येऊ न शकल्याने या कारवाईकडे महापालिका निरीक्षकांनी दुर्लक्ष केले. आज सायंकाळपासून अशी कारवाई करण्याविषयी त्यांची बैठक घेतली जाणार आहे. केवळ पर्यटकच शहरात विना मास्क फिरत नाहीत, तर स्थानिक लोकही मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. हे लक्षात घेऊन पर्यटकांनी आणि नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापौर मडकईकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या