गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांचे दुःखद निधन 

Surendra Sirsat
Surendra Sirsat

पणजी : गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट (वय 80 वर्षे) यांचे आज रात्री म्हापसा येथील खासगी इस्पितळात निधन झाले. गेले दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि काल रात्रीपासून त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. (Former Speaker of Goa Legislative Assembly Surendra Sirsat passed away tragically)

म्हापसा येथे 19 नोव्हेंबर 1946 रोजी जन्मलेल्या सिरसाट यांनी 1963 पासून 14 वर्षे दैनिक गोमन्तकसाठी म्हापसा प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता केली होती. ज्ञान प्रसारक मंडळाच्या सरोजनी मधुसूदन कुशे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सिरसाट यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. 1975 मध्ये ते म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1976 मध्ये ते म्हापसा अर्बन बँकेचे संचालक झाले.1977 मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे त्यांना म्हापसा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. 1978 मध्ये ते गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले. 1989 व 1994 मध्ये ते मगो पक्षाच्या उमेदवारीवर पुन्हा विजयी झाले 1991 मध्ये त्यांना विधानसभेचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ख्रिस्तवासी डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या मंत्रिमंडळात पंचायत मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही ते नऊ वर्षे काम पाहत होते.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष नंतर त्यांनी जनता पक्षाच्या गोवा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष झाले होते. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम करण्याची संधी दिली होती. 2004 मध्ये त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यांना  संगणक साक्षरता उत्कृष्टता पुरस्कार माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते 2005 मध्ये देण्यात आला होता.

हौशी रंगभूमीवर ते नाटकातही काम करत असत. म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे ते विश्वस्त होते तसे या मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. म्हापसा शहरातील सर्वात जुने मंदिर असलेल्या श्री महारूद्र संस्थांचे ते माजी अध्यक्ष होते. वैश्य भारतीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आमदार असताना त्याने अनेक खासगी विधेयके विधानसभेत सादर केली होती, त्यामध्ये महिला आयोग स्थापनेचे विधेयक आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com