ज्योकीम व युरी आलेमाव यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

काँग्रेसचे कुंकळ्ळीचे उमेदवार म्हणून पाहण्यात येत असलेले युरी आलेमाव व त्यांचे वडील तथा माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मडगाव : काँग्रेसचे कुंकळ्ळीचे उमेदवार म्हणून पाहण्यात येत असलेले युरी आलेमाव व त्यांचे वडील तथा माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या प्रवेशाने काँग्रेसचा कुंकळ्ळी व सांगे मतदारसंघात प्रभाव वाढणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. 

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाजवळ झालेल्या कार्यक्रमात या नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा, युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, एम. के. शेख, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, सरचिटणीस जना भंडारी, अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

ज्योकीम आलेमाव आमदार व मंत्री असताना कुंकळ्ळीचा चौफेर विकास झाला. त्यानंतर अन्य दोन आमदारांच्या कारकीर्दीत कुंकळ्ळीत कोणताही विकास झाला नाही. यापुढे काँग्रेसची कुंकळ्ळीत व सांगे मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी आपण झटणार असल्याचे व काँग्रेसची संस्कृती जपणार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले. 

आपण पूर्वी काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत यांनी आपल्यास नेहमीच चांगले सहकार्य केले. या नेत्यांच्या पाठबळावर आपण कुंकळ्ळी मतदारसंघाचा विकास करू शकलो. काँग्रेसमध्येच गोव्याचा विकास करण्याचे सामर्थ्य आहे, असे ज्योकीम आलेमाव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या