माजी जिल्हा पंचायत सदस्य सुप्रिया महाले यांचे निधन

Prakash Talvanekar
सोमवार, 27 जुलै 2020

माजी जिल्हा पंचायत सदस्य सौ. सुप्रिया सुदन महाले (वय ५४) यांचे आज (ता. २६) पहाटे उगवे येथील त्यांच्या रहात्या घरी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर आज दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पेडणे

यावेळी विविध पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य, पेडणे नगरपालिकेचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक, पत्रकार, सरकारी अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
तांबोसे - मोप -उगवे पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले यांच्या त्या मातोश्री होत. तोर्से हायस्कूलचे निवृत्त कर्मचारी सुदन महाले यांच्या त्या पत्नी, तांबोसे मोप उगवे पंचायतीचे माजी सरपंच दशरथ महाले व पेडणे बाजार पेठेतील व्यापारी अनंत महाले यांच्या भावजय, माजी पंचायत सदस्य सौ. सुनिता महाले यांच्या जाऊ होत. त्यांच्या पश्चात पती, एक पुत्र, एक विवाहीत कन्या, दिर, जावा, पुतणे पुतण्या, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
२००६ मध्ये जिल्हा पंचायत निवडणुकीत त्या त्यावेळच्या तोर्से मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. जिल्हा पंचायत सदस्यपदाच्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात महिलांचे संघटन केले. महिलांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. केंद्र सरकार व राज्य सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले होते. तसेच विविध पंचायती, सामाजिक संस्थांनीही त्यांचा सत्कार केला होता. सरकारने त्यांना राज्यात व राज्यबाहेरील काही प्रदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविले होते. काही दौऱ्यात त्यांनी महिलांचे प्रतिनिधीत्वही केले होते. तांबोसे पंचायतीच्या विविध समित्यांमध्ये त्या सध्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या