तोर्डा जळीतकांड प्रकरणी चार अटकेत

दत्ता शिरोडकर
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

पवन श्रीकांत बडीगर ( रा.म्हापसा) आणि प्रशांत लक्ष्मण दाभोलकर (रा.बार्देश गोवा) अशी त्यांची नावे आहेत.

पर्वरी

माहिती हक्क कार्यकर्ते विलास मेथर यांच्या खून प्रकरणाचा छडा तीन दिवसात पोलिसांनी लावला आहे. मेथर यांना जीवंत जाळणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे सिंधुदुर्गातील पोलिस अन्वेषण विभागाच्या मदतीने तळेरे कणकवली येथे अटक केली. त्यांच्याकडून एक वाहनही जप्त करण्यात आले आहे. या दोघांनी मेथर यांना मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयावरून पर्वरीतील एका बिल्डरला आणि यात त्याला मदत करण्याऱ्या अन्य एकास मिळून चार जणांना पोलिसांनी पकडले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, तळेरे ते वैभववाडी रस्‍त्यावर म्हापसा येथील वाहतूक कार्यालयात नोंद असलेल्या जीए-०३-वाय ०९९० क्रमांकाच्या फॉर्म्युनर कारमधून दोघेजण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोवा पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांना दिलेल्या मोबाईल क्रमांकांचे स्थळही तेच वाहन आहे असे दर्शवत होते. यावरून सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई करत वाहनातील दोघांना ताब्यात घेतले. पवन श्रीकांत बडीगर ( रा.म्हापसा) आणि प्रशांत लक्ष्मण दाभोलकर (रा.बार्देश गोवा) अशी त्यांची नावे आहेत.
तोर्डा येथे साल्वादोर द मुंद ग्रामपंचायतीतून माहिती हक्क कायद्याखाली मिळालेली कागदपत्रे घेऊन १४ रोजी परतत असताना दुपारी दीड वाजता त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी शेजारील शेतात धाव घेतली मात्र इस्पितळात १५ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. यानंतर पर्वरीतील भाजपचे स्थानिक नेते, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, दुसऱ्यादिवशी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळांनी पोलिसांची भेट घेऊन तपासकाम वेगाने व्हावे अशी मागणी केली होती. भाजपच्या नेत्यांनी एका बिल्डरविषयी पोलिसांत संशयही व्यक्त केला होता. मेथर यांच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी हरिता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात संशयितांविरोधात भारतीय दंड विधानाच्या ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू होता.
मेथर यांच्या खून प्रकरणातील दोघे संशयित गेले दोन दिवस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी फिरत असल्याची माहिती पोलिसांना आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून समजली होती. त्यांनी याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या पथकाने या दोघांचा शोध सुरू ठेवला होता. यात या दोहोंचे लोकेशन तळेरे-वैभववाडी रस्त्यावर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आज दुपारी बाराच्या सुमारास तळेरे येथे दोन्ही संशयितांना त्यांच्या ताब्यातील फॉर्म्युनर कारसह (जीए-०३-वाय ०९९०) ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी या दोन्ही आरोपींना कणकवली पोलिस ठाण्यात आणून नोंद करण्यात आली. त्यानंतर पेडणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दोन्ही आरोपींना घेऊन गोवा गाठले. या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलिस नाईक कृष्णा केसरकर, जयेश सरमळकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, संकेत खाडये आदी सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या