उघड्या चिरेखाणीसंदर्भात अद्याप कोणतीही उपाययोजना नाही

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

तुये येथील चिरेखाणीत येथील चार विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू येण्याच्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. संध्याकाळची पाच साडेपाचाचची वेळ. तालुक्यात सगळीकडे ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली. यामुळे पेडणे तालुकाच नव्हे, तर या घटनेने संपूर्ण गोवाच हादरला.

पेडणे: तुये येथील चिरेखाणीत येथील चार विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू येण्याच्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. संध्याकाळची पाच साडेपाचाचची वेळ. तालुक्यात सगळीकडे ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली. यामुळे पेडणे तालुकाच नव्हे, तर या घटनेने संपूर्ण गोवाच हादरला. चिरे काढण्याचा व्यवसाय संपल्यानंतर तशाच स्थितीत सोडून दिलेली ही चिरेखाण. याच चिरेखाणीप्रमाणे तालुक्यात चिरेखाणीचा व्यवसाय संपल्यानंतर तशाच स्थितीत सुरक्षेची उपाययोजना न करता उघड्या स्थितीतील चिरेखाणींची संख्या बरीच मोठी आहे. मामलेदार कार्यालयातून तलाठ्यांना संपूर्ण तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले, तर मुख्यमंत्र्यानीही अशा बेकायदेशीर व धोकादायक चिरेखाणीवर कारवाई करून अशा दुर्घटना होऊ नयेत यावर उपाययोजना करण्यात येइल असे जाहीर केले.

या घटनेमुळे काही दिवस लोक हळहळले व सगळे विसरून गेले. तसे सरकारही सगळे विसरले. फक्त दुर्घटनेतील मुलांच्या आई वडिलांना जन्मभर हे दुख सलत राहणार आहे. यातील काही विद्यार्थ्यांना तर आई बाबाही नाहीत. या अशा उघड्या स्थितीत असलेल्या उघड्या चिरेखाणीवर अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून अद्याप कोणतीही उपाययोजना न केल्याने या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुर्घटना घडलेल्या या चिरेखाणीत ही दुर्घटना घडल्यानंतर तालुक्यात अशाच प्रकारे कुठलेही संरक्षण नसलेल्या चिरेखाणींचा प्रश्न समोर आला. तलाठ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार पेडणे तालुक्यात अशा ३७ चिरेखाणी आहेत. 

पावसाळ्यात या चिरेखाणी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. चिऱ्यासाठी खोदकाम करत गेल्याने तीस चाळीस मीटरपर्यंत या अशा चिरेखाणी खोल आहेत.
 तुडुंब भरलेल्या अशा खाणी बघितल्यावर त्यात पोहण्याचा मोह होतो किंवा हात पाय धुण्यासाठी कुणी उतरले, तर अंदाज न आल्याने किंवा माती कोसळून अशा दुर्घटना होऊ शकतात. या अगोदर तालुक्यात उघड्या चिरेखाणीमुळे तीन दुर्घटना घडल्या आहेत. तुये येथील या दुर्घटने नंतर १० मार्च  रोजी वझरी येथील उघड्या चिरेखाणीत पोहण्यासाठी उतरलेल्या म्हापसा येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला. तरीही सरकार अजून अशा बेकायदेशीर चिरेखाण मालकांवर कसलीही कारवाई करत नाही. दुर्घटना घडू नये म्हणून कुठलीही उपाय योजना करत नाही. यावर सरकारवर कुणाचा दवाब येतो की सरकार कुणाला तरी सांभाळण्याचा प्रयत्न करते असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

तुये पंचायतीचा चुकीचा फलक
दुर्घटना झालेल्या या चिरेखाणीच्या बाजुने जाताना तुये ग्रामपंचायतीने तीन चार ठिकाणी ‘सावधान पुढे  खोल खड्डा आहे’ असे फलक लावले आहेत. या चिरेखाणीच्या बाजूने जाताना कच्च्या रस्त्यावर मात्र अनेक खड्डे आहेत. या खड्ड्यांची सूचना देण्यासाठी हे फलक लावले आहेत की चिरेखाणीला खड्डा म्हटले आहे हे स्पष्ट होत नाही. खड्डा हा फार तर अर्धा एक फूट खोल असतो. तीस चाळीस मीटर खोल असलेल्या व मृत्यूचे डोह बनलेल्या या चिरेखाणींना तुये ग्रामपंचायत खड्डा समजते ही एक दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल.

संबंधित बातम्या