एमईपी कंपनीवर कोणाचा आशीर्वाद ?

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. राजापूरपासून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम झाले आहे; मात्र आरवली ते तळेकांटे ४० किमीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला काही भवितव्य नाही.

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. राजापूरपासून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम झाले आहे; मात्र आरवली ते तळेकांटे ४० किमीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला काही भवितव्य नाही. एमईपी कंपनीला टर्मिनेट करून चांगले काम करणाऱ्या ठेकेदाराला हे काम द्यावे, अशी मागणी आम्ही नितीन गडकरींकडे केली आहे. परंतु एमईपी कंपनीवर कोणाचा आशीर्वाद आहे हे कळत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, एमईपी कंपनीला महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आरवली ते कांटे असे ९२ किमीचे काम दोन टप्प्यात दिले आहे. कंपनीचे काम पहिल्यापासूनच धिम्या गतीने सुरू होते. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्यात येणार होती. तशी नोटीसही कंपनीला देण्यात आली होती परंतु तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही अपेक्षित काम झालेले नाही.

कांटे ते वाकेड फक्त १० टक्के तर आरवली ते कांटे साडेआठ टक्के चौपदरीकरणाचे काम झाले आहे, असे सांगून खासदार राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग व अन्य ठिकाणी हीच कामे अंतिम टप्प्यात आहेत. मार्च २०२१पर्यंत राजापूरपासून पुढे सिंधुदुर्गपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल. लांजा तालुक्‍यातील "ह्यान इन्फ्रा सोल्यूशन प्रा. लि. कंपनी''ने घेतलेल्या कामाला गती मिळाली आहे.

संबंधित बातम्या