वास्को परिसरात आणखी चौघांचा मृत्यू

Baburao Rivankar
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

मुरगाव तालुक्यात आतापर्यंत जे ३० रुग्ण कोविडने मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना पूर्वाश्रमीचे आजार होते, असा अहवाल प्रशासन देत असले, तरी लोकांचे एकापाठोपाठ मृत्यू होत असल्याने वास्को परिसरात चिंता वाढली आहे. आज रविवारी चार जणांचा बळी गेला.

मुरगाव
गोव्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सर्वाधिक रुग्ण मुरगाव तालुक्यातील आहेत. मांगोरहिल, सडा, बायणा, खारवीवाडा, नवेवाडे, चिखली, झुआरीनगर, कुठ्ठाळी या परिसरात रुग्ण सापडले आहेत. दाटीवाटीच्या परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन करून संसर्ग पसरू नये याची दखल घेतली आहे, तरीही रुग्णांची संख्या घटलेली नाही. जसे रुग्ण वाढत आहे त्याच गतीने मृत्तांचा आकडाही मुरगाव तालुक्यात वाढू लागला आहे.
मुरगाव तालुक्यातील वास्को परिसरात सर्वाधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. यात एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचाही समावेश आहे. जे रुग्ण मृत्युमुखी पडले त्यांना पूर्वाश्रमीचे आजार होते असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. काहींना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधूमेह, श्र्वसनाचा, मूत्रपिंड, फुफ्फुसाचा आजार होता असे सांगितले जाते. हे जीवघेणे आजार वास्को परिसरातील लोकांना जडण्यामागे कोणते कारण असावे असा प्रश्न सध्या लोकांना पडला असून सामाजिक चळवळीतील लोक मुरगाव बंदरातील कोळशाच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक रोग जडल्याचा आरोप करीत आहेत.
गोंयचो आवाज संघटनेचे निमंत्रक कॅप्टन वेरियेटो फर्नांडिस यांनी वास्कोत कोरोना रुग्ण दगावण्याचे कारण म्हणजे कोळसा प्रदूषण असल्याचे मत व्यक्त केले. सडा भागातील समाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनीसुद्धा कोळसा प्रदूषणामुळे लोकांना नानाविध रोग जडले असल्याचे मत व्यक्त करून कोरोनामुळे होणारे मृत्यू प्रदुषणामुळे होत असावेत अशी शंका वर्तविली आहे.
दरम्यान, आतापर्यंत वास्को परिसरात ३० रुग्ण कोविडमुळे दगावले आहेत. त्यामुळे वास्कोत भीतीचे वातावरण पसरले आहे. मांगोरहिल झोपडपट्टीतून कोरोनाचा उगम झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने वास्को लॉकडाऊन केले असते, तर विद्यमान परिस्थिती निर्माण झाली नसती असे मत वास्कोवासीय व्यक्त करीत आहेत. मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लुस आल्मेदा, एलिना साल्ढाणा, नगराध्यक्ष नंदादीप राऊत, चिखलीचे सरपंच सेबी परेरा, कँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गोव्यातील जनतेवर कोरोनाचे संकट पसरले आहे, असा आरोप सर्व थरातून व्यक्ते केला जात आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या