वीर तानाजी मालुसरेंचे वंशज राहतात गोव्‍यात

तेजश्री कुंभार
बुधवार, 20 मे 2020

छत्रपती शिवाजी महाराज म्‍हणाले की, ‘गड आला, पण माझा सिंह गेला’. त्‍यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्‍याला ‘सिंहगड’ असे नाव दिले. हा क्षण माझ्‍यासह आमच्‍या कुटुंबातील प्रत्‍येकाला अभिमानास्‍पद आहे.

पणजी,

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्‍या स्‍वराज्‍यासाठी ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं’ असे म्‍हणत अशक्‍यप्राय लक्ष्‍य साध्‍य करताना शहीद झालेल्‍या वीर तानाजी मालुसरे यांना सगळेच ओळखतात. स्‍वराज्‍यासाठी आणि शिवाजी महाराजांवरील श्रद्धा व प्रेमापोटी घरात स्‍वत:च्‍या मुलाचे लग्‍न असून मोहिमेवर जाणाऱ्या आणि धारातीर्थी पडणाऱ्या तानाजींची ओळख इतरांप्रमाणे त्‍यांचे वंशज म्‍हणून आम्‍हालाही जगायला बळ देत असल्‍याची प्रतिक्रिया वीर तानाजी मालुसरे यांच्‍या तेराव्‍या वंशज स्‍नेहल मालुसरे यांनी ‘दैनिक गोमन्‍तक’ला दिलेल्‍या खास मुलाखतीत व्‍यक्‍त केली.
स्‍नेहल आणि त्‍यांचे कुटुंब गोव्‍याचे रहिवासी आहेत. रिनफोर्स आर्किटेक्‍ट इंजिनिअरिंग अँड कॉन्‍ट्रँईंग ही कंपनी त्‍यांनी उभी केली आहे. वयाच्‍या २२व्‍या वर्षापासून त्‍या उद्योजिका म्‍हणून कार्यरत आहेत. स्‍नेहल यांचे शिक्षणही गोवा कला महाविद्यालयात झाले आहे. त्‍यानंतर त्‍या गेली काही वर्षे आर्किटेक्‍ट म्‍हणून काम केले. २०१९ सालापासून त्‍यांनी उद्योग क्षेत्रात पाय रोवले आहेत.

वीर तानाजी यांच्‍या आयुष्‍यावर चित्रपट आला. ही गोष्‍ट आमच्‍यासाठी अत्‍यंत अभिमानास्‍पद आहे. लहानपणापासून आम्‍ही त्‍यांच्‍या शौर्यकथा ऐकत मोठे झालो आहोत. कधीकधी मन उदास होते, त्‍यावेळी वीर तानाजींच्‍या शौर्यकथा आठवून आम्‍ही उदास मनात बळ आणत असू. लहानपणी खेळताना शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? हा वाद इतर करीत बसायचे. पण, आम्‍ही भावंडे तानाजी मालुसरे कोण होणार यावरून वाद घालत असू. कारण आमच्‍यातील प्रत्‍येकाला आपण तानाजी व्‍हावे, असे वाटत असे. आजही आम्‍ही स्‍वत:ला शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्‍या तत्‍वांवर चालणारे महाराजांचे पाईक म्‍हणूनच पाहतो, असे स्‍नेहल म्‍हणाल्‍या.

‘गड आला, पण
माझा सिंह गेला...’ची गोष्‍ट
वीर मालुसरे यांनी मोहिमेवर जाण्‍यापूर्वी महाराजांना दिलेला शब्‍द म्‍हणजेच ‘आधी लगीन कोंढाण्‍याचं आणि मग माझ्‍या रायबाचं’ हे उद्‍गार कानी पडले की आमचा ऊर अभिमानाने दाटून येत असे. वीर मालुसरे हे स्‍वराज्‍यासाठी शहीद झाल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज म्‍हणाले की, ‘गड आला, पण माझा सिंह गेला’. त्‍यानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्‍याला ‘सिंहगड’ असे नाव दिले. हा क्षण माझ्‍यासह आमच्‍या कुटुंबातील प्रत्‍येकाला अभिमानास्‍पद आहे.

आमच्‍या पुर्वजांनी एवढे मोठे कर्तृत्‍व गाजविले की, त्‍याची जाणीव आमच्‍या प्रत्‍येक पिढीला आहे. त्‍यामुळे समाजात जगत असताना आमच्‍याकडून गरजवंतांना मदत व्‍हावी, आपल्‍यामुळे कोणाचे नुकसान होऊ नये म्‍हणून सजग राहण्‍याची शिकवण माझी आई सुनिता मालुसरे आणि वडील नितीन मालुसरे यांनी दिली.
-स्‍नेहल मालुसरे

संबंधित बातम्या