गोव्यात अमेरिकन नागरिकांची फसवणूक; बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

मोरजीतून अमेरिकेत संपर्क, दंडापोटी ते कॅश व्हाऊचर्स उकळायचे
Call Centre
Call CentreDainik Gomantak

पणजी: कोविड महामारी (Covid-19) डोके वर काढत असतानाच सरकारला (Goa Government) पर्यटनक्षेत्राचे दरवाजे उघडण्याची घाई आहे. येथे पर्यटकांच्या (Tourist) रूपात कोण येऊन काय ‘उद्योग’ करतोय याचा पत्ताही सरकारी गुप्तचरांना नसतो. असाच एक धक्कादायक प्रकार टेम्बवाडा मोरजी येथे आज उघडकीस आला. बनावट कॉल सेंटर (call centre) चालवून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या 13 जणांना पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हे शाखा व सायबर गुन्हे विभागाने पकडले आहे.

रूपांतर बिटकॉईनमध्ये करायचे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरजीत बसून या संशयितांनी अनेक अमेरिकन नागरिकांना लुटले आहे. त्यांनी कोणाला व किती रकमेला लुटले याची माहिती गोळा केली जात आहे. यात आणखीनही काहीजण गुंतलेले असू शकतात म्हणून या संशयितांची ओळख आताच जाहीर करता येणार नाही. अमेरिकन नागरिकांना त्यांच्याविषयी खोटी माहिती पुरवत त्याआधारे धमकावत दंड भरण्यासाठी म्हणून कॅश व्हाऊचर्स घेऊन त्यांचे रूपांतर बिटकॉईनमध्ये करण्यात येत असे. मोरजीत त्या इमारतीत हा उद्योग चालत असे त्याच्याबाहेर आत काय चालले आहे, याचा संशय येण्याजोगे काहीही नसे.

Call Centre
Goa AAPची बेरोजगार युवकांसाठी चळवळ

दरम्यान, टेम्बवाडा मोरजी येथे एक महिन्यापासून संशयित राहत होते. हे हॉटेल वजा घर हे दिलीप मोरजे यांचे आहे. एकूण 30 पेक्षा जास्त खोल्यांचे हे हॉटेल वर्षासाठी लीजवर घेतलेले आहे. ही जमीन रशियन नागरिकांनी घेतली होती तेव्हा राजन घाटे यांनी त्यात नांगर घातला होता.

पोलिसांना मोरजीत असे काहीतरी व कुठेतरी सुरू आहे याची माहिती 8 सप्टेंबर रोजी मिळाली होती. मोरजीतून अमेरिकेत विशिष्ट तंत्रज्ञान वापरून संपर्क साधण्यात येत असल्याचे आढळून आल्यानंतर तो संपर्क कुठून केला जातो याची माहिती सायबर तज्ज्ञांकरवी घेणे सुरू करण्यात आले. संशयाची सुई एडन हॉटेल या वास्तूवर येऊन स्थिरावली. खात्री करून पोलिसांनी छापा टाकला आणि 13 जणांना पकडले.

मोरजीतून अमेरिकेत संपर्क

हे संशयित आपण अमेरिकन सरकारचे अधिकारी आहोत असे भासवायचे. अमेरिकन नागरिकांना ते फौजदारी चौकशीत सापडल्याने त्यांचे सोशल सेक्युरिटी नंबर्स (एसएसएन) बंद केले जातील असे धमकावयचे. त्याच्या दंडापोटी ते कॅश व्हाऊचर्स उकळायचे आणि त्यांचे रूपांतर बिटकॉईनमध्ये करायचे. पोलिस तांत्रिक अंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यापूर्वीही झाली कारवाई

यापूर्वी विठ्ठलदासवाडा मोरजी येथे मटका बेटिंग व्यवसाय सुरू होता तेव्हा छापा टाकून तब्बल 75 लाख रुपये व सामुग्री पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळी गुन्हेगारी वृत्ती मोरजीपर्यंत पोचल्याची चर्चा होती ती आता खरी ठरू लागली आहे.

हे हॉटेल दिग्विजय राजपूत व कृणाल शर्मा दोघांनी भागीदारीत भाडे करारावर घेतले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचे भांडण झाले. त्यातून एक भागीदार पळून जात होता. मात्र त्याला वाटा अनोळख्या असल्याने तो पळू शकला नाही आणि त्याला दुसऱ्या भागीदाराने पकडले. कदाचित या दोघांच्या भांडणातूनच हॉटेलमध्ये काय चालते, याची माहिती पोलिसांपर्यंत पोचली असावी अशी चर्चा आहे.

Call Centre
Goa SOP Impact: भटजींचा भाजपवर प्रभाव

‘ते’ आले कसे?

मोरजीत हॉटेल भाड्याने घेऊन या बहाद्दरांनी हा उद्योग सुरू ठेवला होता. कोविडचे दोन्ही मात्रा घेतलेल्यांना राज्याच्या सीमा खुल्या करण्यापूर्वीच महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली व गुजरातमधील हे 13 जण गोव्यात आले होते.

यापूर्वीही पर्यटक बनून राज्यात आलेल्यांनी येथे गुन्हे केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती मात्र गोव्याच्या भूमीचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवरील लुबाडणूक करणारे रॅकेट चालवण्यासाठी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

या प्रकरणात तर हॉटेल वर्षभराच्या भाडेपट्टीवर घेत हा उद्योग करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित केवळ अमेरिकन नागरिकांना लुटत असल्याने त्याविषयी स्थानिकांना कसलीच माहिती नव्हती किंवा त्यांच्या या उद्योगाचा उपद्रवही होत नव्हता.

"मोरजीत पूर्ण क्षमतेचे बनावट कॉल सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी वापरण्यात आलेले 12 संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे 13 संशयितांकडून हस्तगत केली आहेत."

- शोबित सक्सेना, पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com