गोवा राज्यात २०० युनिटपर्यंत वीज मोफत पुरवावी: राहुल म्हांबरे

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत पुरवावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली..

पणजी: राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत पुरवावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यासाठी राज्यभरात जनजागृती सभा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज आंदोलन नावाने ही मोहीम राबवण्यात येईल असे सांगून ते म्हणाले, आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी सांगे तालुक्यातील नेत्रावळी, काणकोण, पणजी आणि वीजमंत्री काब्राल यांच्या  कुडतरीमध्येदेखील खंडित वीज सेवा मिळत असल्याचे लक्षात आणून दिले आहे. यामुळे गोमंतकीयांना विनाकारण इन्व्हर्टर आदी साहित्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. फक्त खंडित वीज सेवाच नव्हे, तर  विजेमधील होणारा चढ-उतार देखील चिंतेचा विषय बनला आहे. विजेत सतत होणाऱ्या चढ-उतारामुळे गोव्यातील नागरिकांना विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या बिघाडांना सामोरे जावे लागत आहे. खंडित वीजसेवा व विजेमधील चढ उतार यासोबतच वीज कार्यालयाच्या वाढीव वीज बिलालादेखील सामोरे जावे लागत आहे. तसेच ही बिले दर महिन्याला न येता एकत्रितपणे एकदम आल्याने ते भरणे देखील गोमंतकीयांना कठीण झाले आहे.

भाजप गेली ९ वर्षे सत्तेत असताना सुरळीत वीजपुरवठा देऊ शकलेला नाही. त्यामुळे उर्वरीत ९ महिन्यांत भाजपचे सरकार २४ तास अखंडित वीज कशी देणार अशी विचारणा करून ते म्हणाले, गोमंतकीयांना २४ तास उत्तम वीज हवी आहे व तो त्यांचा अधिकार आहे. यात भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही अपयशी ठरले आहेत. याविषयावर सरकारने सार्वमत घेतल्यास त्यांची पोलखोल होईल. आम्ही यासाठी दोनशे कोपरा बैठका राज्यभरात घेऊ, असे त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या