या...गोवा तुमची वाट बघतंय‍; ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या 'सेलिब्रेशन'साठी गोव्यात येताना काय आहे खास सोय?

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस घराच्या बाहेरही न पडता येणाऱ्या पर्यटन शौकिनांना या वर्षीही गोवा आपल्याकडे खेचत असेल तर त्यासाठी नवीन अनलॉक पद्धतीनुसार कसे आणि केव्हा जाता येईल हे जाणणे महत्वाचे ठरेल.    

पणजी- डिसेंबर महिना सुरू झाला की अनेकांना वेध लागतात ते गोव्याचे. गोव्यातील पर्यटन, निसर्ग, समुद्र किनारे, बार, रेस्टॉरंट्स, गर्दी लोकांना अक्षरश: आपल्याकडे खेचत असते. तेथील प्रार्थनास्थळेही नाताळ तसेच नवीन वर्षासाठी वैविध्यपूर्ण सजवलेले असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस घराच्या बाहेरही न पडता येणाऱ्या पर्यटन शौकिनांना या वर्षीही गोवा आपल्याकडे खेचत असेल तर त्यासाठी नवीन अनलॉक पद्धतीनुसार कसे आणि केव्हा जाता येईल हे जाणणे महत्वाचे ठरेल.    

वर्षाभरात घडलेल्या सर्व चांगल्या-वाईट घटना विसरून दरवर्षी लोक गोव्यात गर्दी करत नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र, यंदा असे करण्यावर काही प्रमाणात निर्बंध असले तरी लोक तोच उत्साह आणि तेवढीच गर्दी करून आनंद साजरा करतील, असे चित्र आहे. कोरोनाचा उतरता आलेख आणि लशीच्या उपलब्धतेबाबत संभाव्यता यामुळे आता पुन्हा हवाई वाहतूक नियमीत होणार आहे. गोव्यातील विलोभनीय समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी आता भारतभरातून येणाऱ्या पर्यटकांची राज्यात पुन्हा गर्दी होईल यासाठी गोवा सरकारही प्रयत्नशील आहे.   

गोव्याला भारताचे प्रति 'लास वेगास' म्हटले जाते. मात्र, कोरोनामुळे भारतातील देशांतर्गत वाहतुकीवरील प्रतिबंधांमुळे पर्यटकांची गर्दी अतिशय कमी झाली होती. गोव्यातील ही स्तब्धता याआधी कधीच अनुभवण्यास मिळाली नव्हती. यातच गोव्यात सर्वाधिक पर्यटक येणाऱ्या महाराष्ट्रानेही शेजारी राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नियमावली लागू केली. यामुळे राज्यातून बाहेर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली. कारण त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परतताना महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीचा अवलंब करावा लागणार होता. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार 
गोवा प्रेमींना जास्त काळ गोव्यापासून दूर राहावं लागणार नाही.       

दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद येथून गोव्यासाठी फ्रिक्वेन्सी कशी?दरम्यान, 'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'गोव्यात येण्यासाठी दळणवळणाचा भार लक्षात घेता पुढील रविवारी देशाची राजधानी दिल्लीहून गोव्या साठी १३ हवाई उड्डाणे होणार आहेत. तर मुंबईहून गोव्यात येण्यासाठी १५ उड्डाणांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारने विलगीकरणाचे निर्बंध मागे घेतले असून प्रवाश्यांना राज्यात परतण्याआधी फक्त त्यांच्या कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावा लागणार आहे. कर्नाटकातून गोव्यात यायचे असेल तर बंगळूर ते गोवा दरम्यान १२ उड्डाणे होणार आहेत. तर हैदराबामधूनही गोव्यात येण्यासाठी ७ विमाने उड्डाण घेणार आहेत.   

संबंधित बातम्या