पेडणे पालिकेचा इंधन प्रकल्प रखडला

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

 पेडणे नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठ वगळली, तर इतरत्रच बहुतांश भाग हा तसा ग्रामीण भाग. बाजारपेठेत आठवड्याचा बाजार हा मोठा असतो. तसेच अन्य दिवसातही विवध प्रकारच्या सामानाची विक्री करणारे  बरेच विक्रीते येतात, पण कोरोना टाळेबंदीनंतर मार्चपासून हा आठवड्याचा बाजार भरलेला नाही.

पेडणे: पेडणे नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठ वगळली, तर इतरत्रच बहुतांश भाग हा तसा ग्रामीण भाग. बाजारपेठेत आठवड्याचा बाजार हा मोठा असतो. तसेच अन्य दिवसातही विवध प्रकारच्या सामानाची विक्री करणारे  बरेच विक्रीते येतात, पण कोरोना टाळेबंदीनंतर मार्चपासून हा आठवड्याचा बाजार भरलेला नाही. टाळेबंदी उठविली तरीही पूर्वीप्रमाणे विक्रीते बाजाराला येत नाहीत. परिणामी कचराही कमी झालेला आहे. फक्त बाजारपेठेत दर दिवशी तीन किंवा चार लहान टेंपो भरून कचरा नेला जातो. पालिकेच्या अन्य भागातून दरदिवशी सुमारे दोन किंवा तीन लहान रिक्षाटेंपो भरून जिथे इंधन निर्मितीचा प्रकल्प गेली काही वर्षे रखडलेला आहे तिथे नेवून टाकला जातो.

पेडणे नगरपालिका क्षेत्रात कचऱ्याची फार मोठी समस्या नसली तरी नगरपालिका क्षेत्राबरोबरच तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा समस्या सोडविण्यासाठी २०१० च्या सुमारास येथील आयटीआय केंद्रापासून काही अंतरावर कचरा प्रकल्पासाठी यंत्र सामुग्री बसविली, पण त्याकडे कुणी लक्ष न दिल्याने व आवश्यक पाठपुरावा न केल्याने त्यावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये कचऱ्यात गेले.

त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रयत्नाने ‘सुडा’  योजनेअंतर्गत १५ कोटी रुपयांच्या प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्पाचे याच ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांच्या हस्ते पायाभरणी झाली. तत्कालीन नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर यांच्या कालावधीत सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या कामालाही सुरवात झाली  होती.

दरम्यान, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पेडण्याचे आमदार तथा पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर हे पराभूत झाले आणि प्रकल्पाचे कामही  रेंगाळले. त्यानंतर पेडण्याचे नूतन आमदार बाबू आजगावकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला परत वेग आला आणि नंतर परत काम रेंगाळले.

सरकारच्या धोरणानुसार हा प्रकल्प सुरू करण्यामागे गोवा राज्य प्लास्टिकमुक्त करणे हा उद्देश होता. सध्या प्लास्टिक कचरा शेजारी राज्यात प्रक्रियेसाठी नेण्यात येतो. याच ठिकाणी अशा प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया झाली, तर कचरा नेण्यावरील मोठा खर्च वाचणार आहे. तसेच राज्याला उत्पन्नही मिळणार व प्रदूषण कमी होऊन पर्यावरण शुद्ध ठेवणे शक्य होइल. त्याच बरोबर ५० स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या प्रकल्पातून तयार होणाऱ्या  इंधनावर दोन टक्के रक्कम पेडणे नगरपालिकेला मिळणार होती. प्लास्टि पासून  प्रक्रिया करुन इंधन निर्मिती करण्याबरोबरच अन्य ओल्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याची योजना होती. सध्या पेडणे नगरपालिकेने या प्रकल्पात बराच प्लास्टिक कचरा गोळा करुन ठेवला आहे, पण सध्या या प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. ते कधी सुरू होते की पूर्वीच्या कचरा प्रकल्पाप्रमाणे हा प्रकल्पही कचऱ्यात जातो हे सांगता येत नाही.

संबंधित बातम्या