‘त्या’ मृत व्यक्‍तीवर अखेर पैरातच अंत्यसंस्कार

तुकाराम सावंत
गुरुवार, 16 जुलै 2020

मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर, पंच कृष्णा परब, विजय पोळे यांच्यासह पैरातील काही नागरिक तसेच मारुती चिक्‍कोडी तसेच त्यांच्या नातलगांपैकी काहीजण उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेर लोकायुक्‍तांच्या आदेशाची अंबलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिचोली,

डिचोली तालुक्‍यातील पैरा-मये येथील चंद्रकांत कल्लप्पा चिक्‍कोडी यांच्या अंत्यसंस्कारावरुन निर्माण झालेला गुंता एकदाचा सुटला असून, तीन दिवसांच्या परवडीनंतर अखेर पैरातीलच स्मशानभूमीत चिक्‍कोडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकायुक्‍तांनी दिलेल्या आदेशानुसार, अंत्यविधीची कार्यवाही करण्यात आली. बुधवारी सायंकाळी मयताच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पैरा येथील स्मशानभूमीत अंत्यविधी सुरळीतपणे पार पडल्याची माहिती मिळाली आहे. वर्षापूर्वी चिक्‍कोडी कुटुंबियांपैकीच मृत पावलेल्या एका व्यक्‍तीवर पैरा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी प्रखर विरोध केल्यानंतर त्यावेळी त्याच्यावर डिचोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रकांत चिक्‍कोडी यांच्यावर पैरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार की नाही, त्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, चिक्‍कोडी यांच्या नातलगांनी लोकायुक्‍तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेला अनुसरुन पोलिस बंदोबस्तात पैरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा आदेश लोकायुक्‍तांनी सोमवारी दिला होता.

उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक..!
लोकायुक्‍तांनी दिलेल्या आदेशाला अनुसरुन चिक्‍कोडी यांचा मुलगा मारुती चिक्‍कोडी यांनी आपल्या वडिलांचा मृतदेह अंत्यविधीसाठी पैरा येथील स्मशानभूमीत आणण्यात येणार आहे. अशी लेखी कल्पना डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या संशयाचे निमित्त पुढे करुन चंद्रकांत चिकोडी यांच्या मृतदेहावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सकाळी डिचोली येथील उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांच्यासमवेत मये पंचायत आणि चिक्‍कोडी कुटुंबिय यांची एक संयुक्‍त बैठक झाली. या बैठकीवेळी डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित आणि पोलिस निरीक्षक संजय दळवी उपस्थित होते. मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर, पंच कृष्णा परब, विजय पोळे यांच्यासह पैरातील काही नागरिक तसेच मारुती चिक्‍कोडी तसेच त्यांच्या नातलगांपैकी काहीजण उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेर लोकायुक्‍तांच्या आदेशाची अंबलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संबंधित बातम्या