सर्वण ‘तळी’च्या विकासाचे भवितव्य कोमुनिदादच्या हाती

सर्वण ‘तळी’च्या विकासाचे भवितव्य कोमुनिदादच्या हाती
सर्वण ‘तळी’च्या विकासाचे भवितव्य कोमुनिदादच्या हाती

डिचोली: डिचोली तालुक्‍यातील सर्वण येथील नैसर्गिक तळीच्या विकासाचे भवितव्य स्थानिक कोमुनिदादवर अवलंबून असून, येत्या रविवारी (ता. २७) कोमुनिदादच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ उध्दाराच्या प्रतीक्षेत असलेली सर्वण येथील नैसर्गिक तळी प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथील श्‍यामपुरुष मंदिरासमोरील बाजूने साधारण ४०० मीटर अंतरावर कोमुनिदादच्या जागेत (सर्व्हे न. १२९/०) ही तळी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक कोमुनिदादच्या आतापर्यंतच्या नकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या या तळीचा उद्धार करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. भविष्याची गरज ओळखून अडीच वर्षापूर्वी स्थानिक पंचायतीने या तळीच्या विकासाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, तळीचा विकास करण्यास स्थानिक कोमुनिदादकडून अद्याप आवश्‍यक ‘ना हरकत दाखला’ मिळाला नसल्याने या तळीच्या उध्दाराचा प्रस्ताव जवळपास शीतपेटीत पडल्यातच जमा आहे. बाराही महिने पाण्याने वाहणारी ही तळी म्हणजे गावचे वैभव आहे. एक काळ म्हणजेच २५-३० वर्षांपूर्वी या तळीच्या पाण्यावर गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वायंगण शेती करायचे. कुळागरांसाठीही ही तळी वरदान आहे. तीस वर्षांपर्वी सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे या तळीतील गाळ उपसण्यात आला होता. त्यानंतर मात्र, या तळीकडे कोणीच लक्ष दिले नाही. सध्या या तळीला अत्यंत विदारक स्वरुप प्राप्त झाले आहे. सभोवतालच्या माडांची झावळे, पालापाचोळा आदी गाळ साचून ती बुजत आहे. पाण्याची पातळीही दिवसेंदिवस घटत आहे.

प्रशासकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष..!
सर्वण येथील ही तळी कोमुनिदादीच्या जागेत येत असल्याने पंचायतीने कोमुनिदादकडे ‘ना हरकत दाखला’ मागितला. मात्र, कोमुनिदाद मंडळाकडून तो देण्यास आतार्यंत टाळटाळ झाली आहे. त्यानंतर पंचायतीने डिसेंबर २०१७ यावर्षी उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासकांना पत्राद्वारे कोमुनिदादच्या भूमिकेविशी कल्पना दिली. या पत्राची दखल घेऊन कोमुनिदादच्या तत्कालीन प्रशासकांकडून सर्वण कोमुनिदादला पत्र पाठवून तळीच्या विकासकामासाठी आवश्‍यक निर्णय घेवून ना हरकत दाखला देण्याची सुचना केली होती.  मात्र प्रशासकांच्या त्या सुचनेकडे कोमुनिदाद मंडळाने आजपावेतो दुर्लक्ष केल्याची माहिती मिळाली आहे. तळीच्या विकासकामासाठी कोमुनिदादकडून ना हरकत दाखला मिळाला नसल्याचे पत्र मागील जानेवारी महिन्याच्या २ तारखेला पंचायतीने कोमुनिदाद प्रशासन कार्यालयाला दिले आहे. तर मागील मार्च महिन्यात मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी या तळीची पाहणी करुन तळीचे संवर्धन करण्याची गरज प्रतिपादली आहे. मात्र, ना हरकत दाखला मिळत नसल्याने या तळीच्या विकासाच्या प्रस्तावाला चालना देण्यास अडथळा निर्माण झाला आहे.  

रविवारी सर्वसाधारण सभा..!
स्थानिक कारापूर-सर्वण पंचायतीकडून ‘ना हरकत दाखल्या’साठी आलेल्या अर्जावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अखेर येत्या रविवारी (ता. २७) रोजी सर्वण कोमुनिदादने खास सर्वसाधारण सभा बोलावलेली आहे. सकाळी साडेदहा वाजता श्री श्‍यामपुरुष मंदिरात ही सभा होणार आहे. या सर्वसाधारण सभेस कोमुनिदादच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोमुनिदादचे अध्यक्ष बाबलो सावंत यांनी केले आहे. रविवारच्या सर्वसाधारण सभेत कोणता निर्णय होतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com