Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर Dainik Gomantak

Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर

फोंडा शहर परिसरात आकर्षक, पर्यावरणपूरक मखरे तर भक्तांच्या नजरा आकर्षित करीत असून, खरेदीलाही वेग आला आहे.

फोंडा: गणेशोत्सवाची जोरदार तयारी फोंडा तालुक्यात सुरू असून शहरात तर गणेशोत्सवासाठी मखर, माटोळी, विजेची रोषणाई, भाजीपाला, फळे, फुले नवनवीन कपडे, पताका आदी सामानाने गच्च भरला आहे. फोंडा शहर परिसरात आकर्षक, पर्यावरणपूरक मखरे तर भक्तांच्या नजरा आकर्षित करीत असून, खरेदीलाही वेग आला आहे.

गेल्या वर्षी कोविडमुळे सर्वांचा लाडका सण गणेशोत्सव व्यवस्थितरीत्या साजरा करण्यास मिळाला नाही. यंदाही कोविडचा धोका आहेच, पण सुदैवाने गेल्या वर्षीपेक्षा यंदा स्थिती साधारण बरी असल्याने गणेशभक्तांत उत्साह आहे. फोंडा तालुक्यात अठरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून घरोघरी वैयक्तिक गणेशाचे पूजन केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात होणार असला तरी वैयक्तिक घराघरातील गणेशोत्सव यंदा दीड तसेच पाच व सात दिवसांचा असेल, अशी माहिती गणेश भक्तांनी दिली.

Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर
उद्योजकांकडून गोवा सरकारवर टीका

फोंडा तालुका अर्थातच अंत्रुज महाल हा राज्याचा सांस्कृतिक प्रदेश असून इतर तालुक्यात नसेल एवढ्या मोठ्या संख्येने देवालये या भागात आहेत. फोंडा तालुक्यातील गणेशोत्सवही आगळावेगळा आहे. कुठे दीड दिवस तर कुठे पाच व सात दिवसांचे ‘तिसाल'' अर्थातच पारंपरिकरीत्या ठरल्याप्रमाणे वैयक्तिक घरांतील गणपती पाच व सात दिवसांचा असतो. यंदाही अनेक गावात तिसाल असून त्याची तयारी गणेशभक्तांनी जोरात सुरू केली आहे.

फोंड्यात मखर मेळा सजला असून अनेक ठिकाणी आकर्षक मखरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. फोंडा वरचा बाजार मार्केट संकुलातही मखर मेळ्यात पर्यावरणपूरक मखरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. घरातच मखरे तयार करण्यासाठी आवश्‍यक साहित्य मखर मेळ्यात उपलब्ध केल्याने गणेश भक्तांसाठी ती पर्वणीच ठरली आहे.

मखरांबरोबरच विजेच्या रोषणाईचे सामानही शहर परिसरात उपलब्ध करण्यात आले आहे. रंगीबेरंगी दीपमाळा तसेच मखरांसाठी विजेचे दिवे आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. प्लास्टिक फुले व फुलांचे हारही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असून नवनवीन कपड्यांनी दुकाने सजली आहेत. बाजार भागात फळे, भाजीपाला तसेच माटोळीचे सामानही विक्रीसाठी आले असल्याने गणेश भक्तांची लगबग वाढली आहे. एकंदरित गेल्या वर्षी हुकलेला आनंद निदान यावर्षी तरी भरून निघू दे रे बाप्पा, अशीच प्रार्थना गणेश भक्तांकडून होत असेल हे नक्की.

चित्रशाळांत महाराष्ट्रातीलही गणेशमूर्ती

फोंडा तालुक्यातील विविध चित्रशाळांत सुबक सुंदर गणेश मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गावातील गणपतींच्या चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत. तर शहरी भागात भाड्याने दुकाने घेऊन त्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून गणेश मूर्ती आणून विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीचा दरही वाजवी असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असल्याने चिकणमातीच्या गणेशमूर्तीनाच सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून गोमंतकीयांनी पर्यावरणपूरक मखरांवर भर दिला आहे. हाताळण्यासाठी सोपी व आकर्षक रंगसंगतीमुळे अशा मखरांनाच आता मागणी वाढली आहे. शिवाय दरही रास्त असल्याने गणेश भक्त ही मखरेच जास्त पसंत करतात.

त्रिपूर चोडणकर (तळावली - दुर्भाट)

गेल्या वर्षी चतुर्थी अशीच गेली. यंदा कोरोनाचे प्रमाण त्यामानाने कमी असल्याने लोकांत उत्साह आहे. मात्र खरेदीसाठी उगाच गर्दी करू नका. गर्दीमुळे कोरोनाला निमंत्रण मिळू शकते, म्हणून प्रत्येकाने कोविडचे भान राखूनच चतुर्थी साजरी करावी.

प्रदीप गावकर (बेतोडा - फोंडा)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com