कोरोना महामारीच्या सावटाखाली गणेशोत्सव कसा साजरा करतात

फोंड्यातील मंडळांकडून कार्यक्रमांना फाटा
फोंड्यातील मंडळांकडून कार्यक्रमांना फाटा

फोंडा: कोरोना महामारीच्या सावटाखाली साजरा झालेल्या यंदा गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवातही सांस्कृतिक कार्यक्रमांना फाट देण्यात आला. फोंड्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री मूर्तींचे काल (रविवारी) संध्याकाळी विसर्जन झाले. काही ठिकाणी दरवर्षी प्रथेप्रमाणे पाच दिवसांचा घरगुती गणपती आहे, मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे हा गणेशोत्सवही मर्यादित स्वरुपात आहे. विशेष म्हणजे फोंडा तालुक्‍यातील आडपई गावचा विविध कुटुंबियांचा गणेशोत्सव यंदा पाच दिवसांचा असली तरी यंदा चित्ररथ तसेच मिरवणुकीविनाच या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

दरवर्षी सार्वजनिक गणेशोोत्सवात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद विविध स्पर्धा, नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रम असतात. यंदा मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केवळ गणपती पूजनापुरता मंडप घातला व पंचमीदिवशी संध्याकाळी साधेपणाने श्रीचे विसर्जन केले. फटाक्‍यांची आतषबाजी झाली, पण ती मर्यादित स्वरुपात.

गणेश चतुर्थीच्या काळात फोंडा बाजारात चतुर्थीच्या आधी दोन दिवसांपर्यंत सामाजिक अंतर राखून खरेदी करण्यात आली होती, मात्र चतुर्थीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यावेळी काही ग्राहक व विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील मास्कही हनुवटीखाली दिसला. 

दरवर्षी फोंडा तालुक्‍यात गणेशोत्सव काळात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे किमान पन्नास लाख रुपयांचे फटाके व इतर दारुकामाचे साहित्य आगीत टाकले जाते. फटाक्‍यांच्या व दारूकामाच्या नावाखाली किमान पन्नास लाख रुपये खाक केले जातात, मात्र यंदा फटाक्‍यांची खरेदीही मर्यादित स्वरुपात होती. 

चतुर्थीच्या आरत्यांवेळी काही ठिकाणी सामाजिक अंतर राखून तसेच मास्क घालूनच आरत्या करण्यात आल्या, तर काही ठिकाणी गणरायावर सर्व भार सोडून मास्कविना आरत्या सादर करताना गणेश भक्त दिसले. 

एकंदर फोंडा तालुक्‍यातील गणेशोत्सव काळात भाविकांच्या मनात धाकधूक आणि भीती बाळगूनच गणेशोत्सव साजरा झाला, त्यात काही ठिकाणी खबरदारी तर काही ठिकामी बेपर्वाई नजरेस पडली. 

कोरोनाच्या नायनाटासह खाणी सुरू करण्यासाठी घातले साकडे!
राज्यात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात विसर्जनावेळी गाऱ्हाणे घालताना कोरोनाचा नायनाट करण्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला. जगभर कोरोनामुळे लोक हवालदिल झाले आहेत, लोकांची रोजीरोटी गेली आहे, उत्सवांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे, त्यामुळे कोरोनाचे संकट आधी दूर कर, असे साकडे गणरायाला घातले गेले. दुसऱ्या बाजूला खाण भागात कोरोनाचा नायनाट करण्याबरोबरच खनिज खाणी लवकर सुरू होऊ दे, अशाप्रकारचे साकडे गणरायासमोर घालण्यात आले. एकंदर हतबल झालेला भाविक गणरायासमोर नतमस्तक झाला होता. 

आडपईत साधेपणाने यंदा पाच दिवसांचे विसर्जन होणार!
राज्यातील वैशिष्ट्यपूूर्ण असा आडपई गावातील गणेशोत्सवातील विसर्जन सोहळा यंदा साधेपणाने होणार आहे. दरवर्षी आडपईतील पाच दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी विविध ठिकाणांहून लोक येतात. या विसर्जन कार्यक्रमात चित्ररथांसह दिंडी मिरवणुका काढण्यात येतात, हा सोहळा पाहण्यासारखा असतो. आडपईतील खुमणे भाटकर,कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, शिवंबा निवास आदी कुटुंबातील हा गणेशोत्सव असतो. यंदा कोरोनामुळे दुपारी दोन ते पाचपर्यंत विसर्जन होणार आहे. त्यात प्रत्येक कुटुंबातील मर्यादित सदस्यांनी उपस्थित रहावे त्याचबरोबर दत्त मंडपात सामूहिक आरत्या होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com