मुरगावचा राजा ‘गणराया’ला भावपूर्ण निरोप

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

 ‘कोरोना’च्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने सडा भागातील नावलौकिक प्राप्त झालेला मुरगावचा राजा गणेशाला यंदा दीड दिवसांतच भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मुरगाव:  ‘कोरोना’च्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने सडा भागातील नावलौकिक प्राप्त झालेला मुरगावचा राजा गणेशाला यंदा दीड दिवसांतच भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सडा येथील गणेशभक्त बालन चोडणकर यांनी एका तपापूर्वी मुरगावचा राजा मंडळ स्थापन करून सडा नाक्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. दरवर्षी नऊ दिवस विविधांगी कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जायचा. पण, यंदा कोरोनामुळे फक्त दीड दिवसच उत्सव साजरा करून सड्यावरील गणेशभक्तांनी लाडक्या मुरगावचा राजाला निरोप दिला.

बायणा समुद्रात रविवारी रात्री नाचत-गाजत भक्तगणांनी मुरगावचा राजा गणपतीचे विसर्जन केले. दरम्यान, मुरगावचा राजा मंडपामुळे वाद निर्माण करण्यात आल्याने यंदा ह्याच मंडपात गणपती पूजन होईल का? अशी संशयाची पाल गणेशभक्तांच्या मनात चुरचुरत होती. अखेर हा सर्व संशय दूर करून बालन चोडणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने दीड दिवसांच्या उत्सव साजरा केला.

दीड दिवसांच्या मुरगावचा राजा गणपतीचे काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी दर्शन घेऊन ‘कोरोना’पासून सर्व जनतेचे रक्षण करावे, अशी प्रार्थना केली. समाजसेवक शंकर पोळजी, सचिन भगत, दामोदर दिवकर, जयेश शेटगावकर व इतरांनी मुरगावचा राजाचे दर्शन घेऊन कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले.
गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी महाआरती आणि तिर्थप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सार्वजनिक साकडे घालून सडा ते बायणा समुद्र किनाऱ्यापर्यंत मिरवणुकीत भक्तगण सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या