कोरोनाचे नियम पाळून दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

पणजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज दुपारी चारच्या सुमारास फेरीबोटीकडे गणपतीचे विसर्जन केले. त्याशिवाय दुपारनंतर मिरामार किनाऱ्यावर नागरिक दीड दिवसाचा गणेमूर्ती विसर्जनासाठी आणत होते.

पणजी: कोरोनामुळे घालण्यात आलेल्या नियम व अटीनुसार राज्यात सर्वत्र आज दीड दिवसाच्या गणरायाराला राज्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला.  यावर्षी फटाके खरेदीत लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखविला नसल्याने ध्वनी आणि हवा प्रदूषणाचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.

लहानग्यांच्या समाधानासाठी काही अंशी फटाके वाजविण्यात आले. राज्यभर यंदा प्रदूषणमुक्त गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. 

पणजीत राजधानीत रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जन करण्याची जी अट घातली होती, तिचे पालन करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

पणजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज दुपारी चारच्या सुमारास फेरीबोटीकडे गणपतीचे विसर्जन केले. त्याशिवाय दुपारनंतर मिरामार किनाऱ्यावर नागरिक दीड दिवसाचा गणेमूर्ती विसर्जनासाठी आणत होते. त्याशिवाय सायंकाळी पाचच्या सुमाराच चार खांबाकडे मानसीवर गणपती विसर्जनास सुरुवात झाली. या ठिकाणी लहान नावांतून गणपतींचे विसर्जन केले जात होते. याशिवाय महापालिकेने ठरवून दिलेल्या विसर्जन जागांवर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बंदर कप्तान खात्याच्या दोन जेटी आणि शांतादुर्गा बोटिंगच्या जेटीवर गणेश विसर्जनासाठी लोक येत होते. 

सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास पावासाचा शिडकाव झाला. त्यावेळीही घरातील गणपती लोकांनी विसर्जनासाठी वाहनातून घराबाहेर काढले होते. यावर्षी सवाद्य मिरवणुका किंवा बँड पथकांना पाचारण करण्याचे लोकांनी टाळले. फोंडा, मडगाव, म्हापसा, मुरगावप्रमाणेच राज्यभर दीड दिवसाच्या बाप्पाला भाविकांनी आज निरोप दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या