पहिल्यांदा अडपईत शांततेत गणेश विसर्जन

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

आडपईत मिरवणुकीला फाटा : तालुक्‍यातील पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन

फोंडा: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा झाला. दरवर्षी दीड, पाच, सात, नऊ आणि अनंत चतुर्दशी व अकरा दिवसांचा गणपती पूजला जातो. पण यंदा बहुतांश गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. 

फोंडा तालुका तर गोव्याची सांस्कृतिक राजधानी. या राजधानीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. गणेशोत्सवात ठिकठिकाणी भजन, कीर्तन, स्पर्धात्मक उपक्रम तसेच दिंडी मिरवणुकीने गणेशाची विसर्जन मिरवणूक निघायची. फोंडा तालुक्‍यातील आडपई येथील पाच दिवसांचा विविध कुटुंबियांचा गणेशोत्सव तर यंदा साधेपणाने साजरा झाला. कोरोनाने आडपईवासीय व त्यांच्या नातेवाईकांबरोबरच राज्यातील विविध भागातून ही मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांचा हिरमोड झाला. 

आडपई गावातील पाच दिवसांच्या या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चित्ररथ मिरवणुकीसह गणपतींची विसर्जन मिरवणूक निघते. आडपईचा रस्ता उत्साहाने फुलून जातो. भाविकांची अमाप गर्दी, आडपईवासीयांच्या सहभागाने निघालेली दिंडी मिरवणूक, वेगवेगळ्या आकर्षक चित्ररथांसह गणेशाची निघणारी मिरवणूक हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी फोंडा तालुक्‍याबरोबरच इतर भागातूनही लोक खास करून पाच दिवसांच्या या आडपईतील गणपतीच्या विसर्जन सोहळ्यास उपस्थिती लावतात. पण, यंदा मात्र कोरोनाने सगळ्या उत्सवावर आणि उत्साहावर पाणी फेरले. 

कधी नव्हे ती यंदा गणपती विसर्जनाची मिरवणूक निघालीच नाही. गेल्या अनेक वर्षांच्या या मिरवणुकीत कोरोनाने खंड पाडला. त्यामुळे आडपईवासीयांबरोबरच त्यांचे नातेवाईक तसेच या विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहणारे भाविक भक्तजनांचा हिरमोड झाला. फोंडा तालुक्‍यातील दुर्भाट, मडकई, प्रियोळ, वळवई, कुर्टी, बोरी, शिरोडा तसेच उसगावसह खांडेपार व इतर भागातील घरगुती गणपतींचे काल (बुधवारी) संध्याकाळी व रात्री विसर्जन करण्यात आले.

संबंधित बातम्या