गणेश भक्तांची कोरोनाचे संकट दूर करण्याची बाप्‍पाला प्रार्थना

Ganesha devotees pray to Ganesha to remove the corona crisis
Ganesha devotees pray to Ganesha to remove the corona crisis

पणजी: ‘बा, विघ्नहर्त्या कोरोनाचे संकट दूर कर!’ अशी मनोमन प्रार्थना करत अनेकांनी गणेश मूर्ती घरी आणल्‍या. सुख, शांती, संपन्नतेची प्रतीक असलेली, बुद्धिची देवता, विघ्नविनाशक गणेशाचे आज घरोघरी आगमन झाले. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आज सुरू झालेल्या चैतन्यदायी पर्वास पुढील दोन दिवसांत उत्तरोत्तर उधाण येत जाणार आहे.

भक्तिभावाने स्‍वागत
राज्यभरात आज जोरदार पडलेल्‍या पावसावरही गणेश भक्तांच्या उत्साहाने मात केली. गेले आठवडाभर गणेश चतुर्थीवर कोरोनाचे सावट असे वातावरण होते. मात्र, आजच्या सुर्योदयाबरोबर ते वातावरण निवळले आणि बाजारातही नेहमीप्रमाणे उलाढाल होताना दिसली. लोक समाज अंतराचे काटेकोर पालन करून सार्वजनिक ठिकाणी वावरत होते. राज्यभरात अनेक ठिकाणी माटोळीचे आणि चतुर्थीचे साहित्य विकणारे बाजार उदयाला आल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्य बाजारपेठांतील गर्दी रोडावलेली दिसली, तरी शहराच्या हद्दीबाहेर, गावागावात रस्त्याच्या कडेला भरलेल्या बाजारांकडे गणेशभक्तांचे पाय वळले होते, हे तितकेच खरे आहे. सकाळपासून लाडक्‍या बाप्पाची मूर्ती घरी नेण्यासाठी, तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. एका वाहनात एक दोघेजणच मूर्ती नेताना दिसत होते. बच्चे कंपनीचा आनंद मात्र ओसंडून वाहताना दिसत होते. काही उत्साही पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ वाजवत, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करतानाही दिसून आले.

भाविकांचे साकडे
गणरायाने कोरोनाचे संकट दूर करावे, अशी गणेशभक्तांची इच्छा आहे. कोरोनामुळे हातात पैसे कमी येण्याचा अनुभव येण्याने त्रस्त झालेल्या समस्त गणेशभक्तांनी गणरायाला आगमनापूर्वीच कोरोनाला हाकला, असे साकडे घातले आहे. गणरायाचे मनापासून स्वागत व्हावे, भक्तिभावाने त्याचे पूजन करून २१ मोदकांचा नैवेद्य दाखवून त्याला खूष करावे म्हणजे तो आपले संकट दूर करेल, अशी भावना भाविकांची आहे. आज कोरोनामुळे औद्योगिक मंदी आली आहे, काहींनी रोजगार गमावला आहे, अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत; सामान्य नागरिक या रोगराईच्या परिणामांत होरपळून गेला आहे. यामुळेच या कोरोनाला हद्दपार करा, असे साकडेच भाविकांनी गणरायाला घातले आहे.

गणरायच कोरोनाला पिटाळतील!
कोरोना टाळेबंदीनंतरच्या काळात सध्या अन्नधान्यापासून भाजीपाल्यापासून कडधान्यापर्यंत साऱ्याच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य माणसाला जिणे नकोसे करून सोडल्याने सामान्य नागरिकांनी महागाईचे संकट दूर करण्यासाठी चक्क संकटमोचक गणरायालाच साकडे घातले आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सामान्य माणूस ग्राहक म्हणून बाजारपेठेत पोहोचला तेव्हा सर्व भाव वाढल्याचे त्याच्या निदर्शनास आले आहे. यामुळेच महागाई कमी करण्याची त्याला कारणीभूत असलेल्या कोरोनालाच गणरायच घालवून देऊ शकतील, अशी आशा असल्याने भाविकांनी चक्क गणरायालाच कोरोनाला परत पाठवा, असे साकडे घातले आहे. 

मार्गदर्शक तत्त्‍वांचे पालन
ढगाळ वातावरण, हलका पाऊस असे वातावरण मागील काही दिवस होते. आजही पावसाने जोरदार हजेरी पहिल्या सत्रात लावली होती. याच वातावरणात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्याच्या विविध भागांत पारंपरिक उत्साह घेऊन शेत शिवारातून तसेच गावांतून गणरायाच्या मूर्तीला वाजत गाजत आणण्यात आले. मात्र, फटाकांना यावेळी बगल देण्‍यात आली. 

श्रावणाला सुरवात झाली की, गणेश मंडळांची लगबग सुरू होते. मंडप, मूर्तीची उंची, त्यानुसार मखर व सजावट ठरवली जाते. काही मंडळे मंडपात अगोदर मूर्ती आणून त्या अनुषंगाने सजावट करतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने सरकारने मार्गदर्शक तत्त्‍वे जारी करण्यापूर्वी मंडळे आणि जनतेने स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत मूर्ती दोन अडीच फुटांच्याच तयार करून घेतल्या आहेत. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काही मूर्तिकारांनी घरपोच बाप्पाची मूर्ती देण्याचा उपक्रम राबवला असला, तरी गर्दी टाळण्यासाठी भक्तांना आधीच गणेशमूर्ती घरी नेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काल व परवाही अनेकांनी मूर्ती घरी नेण्यास सुरवात केली होती.

मोबाईलवर पूजा डाऊनलोड
यंदा गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी कोरोना प्रादुर्भावामुळे पुरोहित उपलब्ध होणार नसल्याने अनेकांनी ऑनलाईन पूजेची सेवा घेण्याचा मार्ग निवडला आहे. तशा पूजा सांगणाऱ्या सीडी बाजारात होत्या, त्या आज हातोहात खपल्या. काहींनी पुरोहितांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे पूजा सांगावी असाही पर्याय निवडला आहे. असे असले तरी काहींच्या घरी पुरोहित येतील असे चित्र आहे. काहींनी पूजा मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवली आहे. ऐनवेळी धांदल नको म्हणून आज काहींनी त्याची रंगीत तालीमही घरात घेतली.

बच्चे कंपनीही झाली समंजस
यंदा आपसूकपणे फटाकेमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. फटाक्यांची काही दुकाने सजली, तरी फटाक्यांना मागणी नव्हती. बच्चे मंडळी एरव्ही खेळण्यातील पिस्तूल घेण्यासाठी आग्रही असतात. निदान फुलबाजा तरी घ्याव्‍यात, असा त्यांचा हट्ट असतो. मात्र, कोरोनाच्या या वातावरणात बच्चे मंडळींनी समंजसपणे फटाक्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. काहींनी रित म्हणून पाच फटाके घेतले होते.

मोबाईलवर शुभेच्छा संदेश
सर्वत्र आज गणरायाची प्रतिष्ठापना होत असताना माहितीचा ‘सुवाहक’ असणाऱ्या मोबाईलवरही विघ्नहर्ता स्थानापन्न झाल्याचे दिसून आले. शिवाय, श्रींच्या आगमनाची द्वाही मोबाईलमधील ‘मेसेज’मधून सर्वत्र फिरली. त्यासाठी अतिशय कल्पक संदेशांचा वापर करण्यात आला. त्यातील काही संदेश असे ‘आज येणार गजानन आपला साथी, कुटुंब साथी, सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो'' तसेच ‘गणरायाचा आशीर्वाद मिळो!’, ‘चांगले आरोग्य लाभो!’, ‘आपली इच्छा पूर्ण होवो!’ याही संदेशांही शुभेच्छांमध्ये समावेश आहे. शुभेच्छा देत असतानाच श्रींची प्रतिकृती तयार करण्यासाठी रेखाचित्रांचा वापर करण्यात आला. काहींनी गणरायाच्या चित्रांचे दर्शनही घडविले.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com