वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे : रेडीघाटातील गणेश मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान

पद्माकर केळकर
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

वाळपईतून पणजी रस्त्याने प्रवास करू लागलात की, अवघ्याच किलो मीटर अंतरावर रेडी घाट लागतो.

वाळपई: वाळपईतून पणजी रस्त्याने प्रवास करू लागलात की, अवघ्याच किलो मीटर अंतरावर रेडी घाट लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जंगलाने वेढा दिलेला व अशा रस्त्याच्या लगत रेडी घाटात असलेले गणेश मंदिर सर्व गणेश भक्तांचे श्रध्दास्थान म्हणून अढळ बनले आहे. या मुख्य रस्त्याने प्रवास करताना प्रत्येकजण गणेशाचे दर्शन घेऊन जातो किंवा वाहन चालक हॉर्न वाजवून तरी पुढील मार्गाने मार्गक्रमण करतात. या मार्गे जाणारी खासगी वाहने, खासगी प्रवासी वाहने, कदंबा बसेस देखील थांबतात. एक हार गणपतीला अर्पण करून, अगरबत्ती दाखवूनच पुढे जातात. सायंकाळच्या वेळेत पणजीतून वाळपईत येणारी प्रवासी वाहनांचे वाहक रेडीघाट सुरू होताच गाडीतच अगरबत्ती पेटवतात. कारण त्यांना आस असते ती गणेश मंदिराकडे पोहचलो की वाहन थांबवून गणेशाला अगरबत्ती दाखविण्याची. अनेक वर्षांपूर्वीपासून याठिकाणी जुनाट रुमडाचे प्रचंड मोठे झाड होते.  या वाटेने जाताना लोक या रुमडाच्या झाडाच्या ठिकाणी थांबून जात होते. एवढेच नव्हे, तर पोर्तुगीज शासनावेळी या भागातील डोंगराच्या ठिकाणी क्रांतीवीर, स्वातंत्र्य सैनिक थांबून पोर्तुगीजांना थोपविण्यासाठी बंडांची कारवाई करीत योजना आखीत होते. या जागेच्या ठिकाणी चार गावांच्या सिमा लागत असून त्यांचे नीसही आहेत. त्यामुळे या रेडीघाटातील या जागेला मोठा इतिहासही आहे. गोवा मुक्तीनंतर हा भाग चांगला परिचयाचा सर्वांसाठी बनला होता. कोणी येता जाता ही देवाची जागा म्हणून नतमस्तक होत होते. कालांतराने येथे देवाची जागा म्हणून उदयास आली. त्यामुळे आपले भक्तगण येथे एखाद्या देव-देवतेंच्या मूर्ती ठेवत असत. पण ही जागा उघड्या स्थितीत असल्याने या ठेवलेल्या मूर्त्या सुरक्षित रहात नव्हत्या. येथे लहानशी घुमटी होती. त्यात गणेशाचा फोटो होता. १९९२ च्या काळात वाळपई तसेच ग्रामीण भागातील समविचारी अनेक समाज बांधवांनी पुढाकार घेऊन लहानसे घुमटाच्या सानिध्यात लहानसे मंदिर उभे झाले. त्यासाठी प्रमुख म्हणून आनंद काणेकर यांनी पुढाकार घेत अनेक सहकारी वर्गाच्या मदतीने मंदिर बांधणीसाठी कार्यवाही हाती घेतली. 

आनंद काणेकर म्हणाले, आपण अनेक चांगल्या सोबतीची माणसे जोडली आहेत. मिळालेल्या संस्कारातून आपली हिंदू दैवते टिकून रहावी असा मानस निर्माण झाला. रेडीघाटातील भागही देवदेवतांच्या सानिध्याचा बनलेला आहे. आम्हाला रेडीघाट येथे गणेश मंदिरासाठी गणेशाची लहानशी मूर्ती होंडा येथून एका मेस्ताने अवघ्या दोनशे रुपयात दिली. फोंडा येथून घुमटी आणण्यात आली व लहानसे मंदिर बांधण्यात आले. पुढे जाऊन अंदाजे १९९५-९६ च्या काळात हे काम करण्यात आले. हे अगदी लहानसे मंदिर बांधण्यासाठी लॉटरी कूपन योजना राबविली. तसेच काहीनी आर्थिक हातभार लावला होता. दरवर्षी गणेशजयंती, विनायकी, संकष्टी असे उत्सव केले जातात. गणेश जयंतीला मोठा उत्सव असतो. या दिवशी दशावतारी नाटकाचे आयोजन केले जाते. दुपारी महाप्रसाद भक्तांना दिला जातो. येथे पूर्वी प्रचंड मोठे रुमडाचे झाड होते. काही वर्षांपूर्वी ते सुकून गेले होते. नंतर त्या जागेत नवीन रुमडाचे झाड लावण्यात आले आहे. वाळपईतील केदार काणेकर हे नित्यनेमाने मंदिरात जाऊन साफ सफाईचे काम सेवाभावी विचारातून करीत आहे. या मंदिरासाठी अनेकजण जोडले गेले आहेत. त्यामुळे रेडीघाटातील हे गणेश मंदिर सर्वांचे श्रध्दास्थान बनले आहे. या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना हे गणेश मंदिर एक आदराचे ठिकाण बनले आहे. प्रत्येकजण या मंदिराजवळ पोहचला की नमस्कार केल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. आपले योजलेले एखादे काम सुरळीतपणे पूर्ण व्हावे यासाठी मनोकामना केली जाते. एकूणच रेडीघाटातील देवाच्या जागेला गणेश मंदिराच्या रुपाने उर्जितावस्था आणून उजेडात आणण्यासाठी केलेले काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या