कोविड सुविधा केंद्रातच गणेशचतुर्थी उत्साहात

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

कोरोना संसर्गाने संक्रमित झालेल्या बहुतेक रुग्णांना यंदा प्रत्यक्ष आपल्या घरातील चतुर्थीचा आनंद व्दिगुणीत करता आला नाही

डिचोली: कोरोना संसर्गाने संक्रमित झालेल्या बहुतेक रुग्णांना यंदा प्रत्यक्ष आपल्या घरातील चतुर्थीचा आनंद व्दिगुणीत करता आला नाही. तरीदेखील डिचोलीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना मात्र प्रत्यक्ष नसला, तरी कोविड केअर केंद्रातच थोड्या प्रमाणात तरी चतुर्थीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. केशव सेवा साधना संचलीत वाठादेव-डिचोली येथील विशेष मुलांच्या शाळेत कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची क्षमता ७१ एवढी आहे. ऐन चतुर्थी काळात या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना चतुर्थीसाठी घरी जाणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे या रुग्णांना यंदा घरातील मंगलमूर्ती गणरायाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, या रुग्णांनी विशेष शाळेतील कायम स्वरुपातील गणपतीच्या मूर्तीचे पूजन आदी सेवा करुन चतुर्थीचा आनंद घेतला. कोरोना महामारीचे विघ्न लवकर दूर होवून सर्वांना सुरक्षित ठेवण्याची प्रार्थनाही या रुग्णांनी विघ्नहर्त्या गणरायापाशी केली.

संबंधित बातम्या