चित्रशाळांतून बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरू

वार्ताहर
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

सध्या कोविड महामारीमुळे अनेक कामे काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात चालू आहे. परंतु  श्री गणेश चतुर्थीमुळे आता प्रत्येकात उत्साह संचारला आहे

गुळेली: सध्या कोविड महामारीमुळे अनेक कामे काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात चालू आहे. परंतु  श्री गणेश चतुर्थीमुळे आता प्रत्येकात उत्साह संचारला आहे. शनिवारी (ता. २२) घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. चित्रशाळांतून बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरू झाली आहे. राज्यातील गणपती चित्र शाळांत या निमित्ताने वेगळाच उत्साह दिसत आहे.

सत्तरी तालुक्यात अधिकाधिक  गावांमध्ये गणपती चित्र शाळा आहेत.किमान एक पंचायत क्षेत्रात एक अशी स्थिती सध्या सत्तरी तालुक्यात आहे. गणपती मूर्तीकार मोठ्या भक्तिभावाने हे एक दैवी कार्य आहे हा उद्देश समोर ठेवून काम करत असतात. हा गणपती करण्याचा वारसा परंपरागत चालू आहे. 

तालुक्यातील गावागावात असलेल्या गणपती चित्रशाळांचा असाच इतिहास आहे. बिंबल सत्तरी येथील भावे बंधूंनी ही परंपरा-कला अजूनी चालू ठेवली आहे. आपला दैनंदिन व्यवहार; नोकरी सांभाळत केवळ परंपरागत ही कला आपल्या घरात सुरू असल्याने ती कायम ठेवण्याचे काम भावे बंधूंनी केले आहे.

वाळपई शहरापासून सुमारे बारा किलोमीटर दूरवर असलेल्या खोतोडा पंचायत क्षेत्रातील बिंबल येथील महागणपती देवस्थानच्या ठिकाणी असलेल्या भावे कुटुंबीयांनी गणपती मूर्तीकला जोपासली आहे. महागणपती चित्रशाळा येथे विनायक दामोदर भावे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबातील लहानथोर मंडळींच्या सहकार्यांने सुरू आहे. या मूर्ती बनवण्याच्या कामात त्यांना ही मंडळी हातभार लावताना दिसत आहे. 

 या चित्र शाळेला भेट दिली तेव्हा मूर्ती रंगवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. विनायक भावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही त्यांची चौथी पिढी हे दैवी काम करत आहे. त्यांच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी आजोबांनी व पणजोबांनी हे गणपती करण्याचे काम केले आहे.

विनायक दामोदर भावे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू भालचंद्र भावे, सहकारी रामनाथ गावडे, दीपक शेटकर, कृष्णा नावेलकर, राजेंद्र सावर्डेकर, देवेश जोशी, सुमित मराठे  व इतर कुटुंबीय त्यांना सहकार्य करीत आहेत.

या चित्र शाळेतून खोतोडा, बिंबल  भागासह धामसे, गुळेली, मुरमुणे, पैकुळ, धडा मेळावली, मैंगीणे,  सावर्डे, गवाणे, शीर-सावर्डे, असोडे तसेच रायबंदर, पणजी आदी ठिकाणी  या चित्रशाळेतून मूर्ती नेल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कोविड महामारीमुळे अनेक समस्यांना तोंड देत मूर्ती घडवत आहेत त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे यंदा सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान आधीच मिळाल्यामुळे थोडे सहकार्य लाभले त्या बद्दल सरकारचे मन:पूर्वक आभार या वेळी भावे यांनी मानले.

 या महामारीमुळे  सगळीकडेच टाळेबंदीचा प्रभाव असल्याने अनेकदा ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळण्यास समस्या जाणवल्याचे भावे यांनी सांगितले.

आता तर  रंग मिळण्यास  त्रास घ्यावे लागला आधी एकाच ठिकाणी रंग मिळत होते पण सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे पाहिजे त्या प्रमाणात रंग एका ठिकाणी मिळाले नाहीत. अनेक ठिकाणी फिरून रंग जमा करावे लागले.हे एक दैवी काम असल्याने श्री गणेश ही सगळी कामे करून घेतो आपण नाममात्र निमित्त असतो, असे ते म्हणाले.

या  कामात घरातील लहान-थोर मंडळींचे सहकार्य लाभल्यामुळेच आपण  हे काम मोठ्या उत्साहाने करू शकतो असे ते यावेळी म्हणाले.

विनायक दामोदर भावे यांचे बंधू भालचंद्र भावे म्हणाले, हे काम केल्यामुळे एक सात्त्विक आनंद मिळतो आणि मन: शांती मिळते. बाकी सर्व गोष्टी  मात करत आम्ही हे काम मोठ्या भक्तीने करीत आलो आहोत आणि यापुढेही करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार माजी उपसभापती, साहित्यिक कै. विष्णू सूर्या वाघ आवर्जून दरवेळी श्रावण महिन्यात येथे येऊन मूर्ती रंगवत. आपल्या हातून थोडी तरी सेवा घडू दे, असे ते वारंवार सांगत, अशी आठवण भावे यांनी सांगितली. चित्रशाळेत एकूण दीडशे गणपती बनवलेले आहेत. 

goa

संबंधित बातम्या