मडगावात चतुर्थीला फटाके, वस्तू विक्रीला अल्प प्रतिसाद

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

यंदा गोव्यातील इतर भागाप्रमाणे मडगावातही लोकांनी चतुर्थी फटाके व दारुकामाशिवाय साजरी केली. मडगाव बाजारातील फटाके व दारुकामाच्या वस्तुच्या विक्रीविषयी अंदाज घेतला, तेव्हा यंदा या वस्तुंना अल्प प्रतिसाद लाभल्याचे व्यापाऱ्यांकडून समजले.

फातोर्डा: यंदा गोव्यातील इतर भागाप्रमाणे मडगावातही लोकांनी चतुर्थी फटाके व दारुकामाशिवाय साजरी केली. मडगाव बाजारातील फटाके व दारुकामाच्या वस्तुच्या विक्रीविषयी अंदाज घेतला, तेव्हा यंदा या वस्तुंना अल्प प्रतिसाद लाभल्याचे व्यापाऱ्यांकडून समजले.

दरवर्षी मडगावी फटाके व इतर दारुकाम वस्तूंची उलाढाल २५ ते ३० लाख रुपयांची होत असे. यंदा मात्र केवळ १० लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली नसल्याचे एक व्यापारी विश्र्वनाथ बोरकर यांनी सांगितले. मडगावी वाय. व्ही फळारी, मंदार पारोडकर व सडेकर हे फटाके व  दारुकाम वस्तूंचे प्रमुख व्यापारी आहेत. त्यांनी यंदा मालही आणला होता, पण जास्त खप न झाल्याने मोठ्या प्रमाणात माल बाकी असल्याचे बोरकर यांनी सांगितले. दरवर्षी वरील विक्रेत्यांच्या दुकानांव्यतिरिक्त पिंपळकट्टा तसेच मार्केटच्या बाहेर लहान लहान स्टॉल्स टाकून फटाक्यांची विक्री व्हायची, पण यंदा हे स्टॉल्सची अनुपस्थिती जाणवली. 

व्यापाऱ्यांनी फटाके व दारुकाम वस्तुंचा स्टॉक केला होता, पण लोकांनीच स्वतः फटाके न वाजविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दारुकामापासून होणाऱ्या धुरापासून जे प्रदूषण होत होते ते टळले. पिंपळकट्टा, पोलिस, आके, कोंबवाडा व इतर सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांनीही श्री गणेशाची मूर्तीचे आगमन व विसर्जनाच्यावेळी फटाके व दारुकामाची आतषबाजी करण्याचे कटाक्षाने टाळले.

शिवकाशी व इतर भागातील दारुकाम उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीचे प्रतिनिधी मार्चमध्ये गोव्यात येऊन ऑर्डर घेतात व मे-जूनपर्यंत माल पोहचवितात. गोव्यात चतुर्थी, दिवाळी व नाताळच्या वेळी फटाके व दारुकाम वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. चतुर्थी संपली आता व्यापारी दिवाळी व नाताळची वाट पाहू लागले आहेत. तोपर्यंत त्यांना लाखो रुपयाच्या फटाके व दारुकामाच्या वस्तू गोदामात जपून ठेवावा लागेल, असे बोरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या