'कोविड' विरोधात गणेशोत्सव मंडळांनी जागृती करावी

प्रतिनिधी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सभापती राजेश पाटणेकर: डिचोलीत  लॉटरी विक्रीचा शुभारंभ

डिचोली: सध्या ''कोविड'' महामारीचे मोठे संकट उभे आहे. या संकटाचा सामना करणे आव्हान असले, तरी प्रत्येकाने त्याबाबतीत सतर्क राहून या महामारीवर विजय प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव मंडळांनीही त्याबाबतीत पुढाकार घ्यावा. असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी केले.

चतुर्थीनिमित्त येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या ''लॉटरी'' विक्रीचा शुभारंभ आणि ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण केल्यानंतर सभापती पाटणेकर बोलत होते. बाजारातील गणपती पूजन मंडपात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, नगराध्यक्ष सतिश गावकर, उपनगराध्यक्ष कुंदन फळारी, कर्करोग तज्ञ डॉ. शेखर साळकर, मुळगावचे सरपंच प्रकाश आरोंदेकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मकरंद तेली, उपाध्यक्ष दत्तगुरु आमोणकर, खजिनदार दिलीप धारगळकर आणि सचिव सत्यवान हरमलकर उपस्थित होते. 

डिचोलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली, तरी डिचोली शहर कोरोनामुक्‍त करण्यासाठी प्रत्येकाने संयम आणि जबाबदारीने वागावे. सार्वजनिक गणेश मंडळानेही त्यासाठी आवश्‍यक ती जागृती करावी. असे आवाहन डॉ. शेखर साळकर यांनी केले. संजय शेट्ये, सतिश गावकर आणि प्रकाश आरोंदेकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. मकरंद तेली यांनी स्वागत केले. प्रा. दिलीप धारगळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर सत्यवान हरमलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर बाजारातील फळ आणि भाजी विक्रेत्यांना फेस शिल्ड वितरीत करण्यात आले.

संबंधित बातम्या