कोरोनाच्या भीतीने जवळच्या दुकानातच गणेशोत्सवाची खरेदी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

कोरोना संसर्गवाढीची भीती लोकांमध्ये असून अनेकजण घरापासून जवळ असलेल्या विक्रेत्यांकडे किंवा बाजारपेठेत जाणे पसंत करीत आहेत. अलिकडे साहित्य खरेदी करताना जास्त चोखंदळपणा करण्यापेक्षा उपलब्ध आहे ते साहित्य घेणे महत्त्वाचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

पणजी: गणेशोत्सवासाठी आवश्‍यक असणाऱ्या माटोळीपासूनच्या इतर सर्व साहित्यांची खरेदी सध्या नागरिक जवळ उपलब्ध असलेल्या ठिकाणांहूनच खरेदी करीत आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे बाणस्तारी बाजारासाठी विविध ठिकाणांहून खरेदीसाठी लोक येत होते आणि जी गर्दी दिसत होती. तशी गर्दी आता दिसली नाही, कारण अनेकांनी जवळच्या विक्रेत्यांकडूनच आवश्‍यक त्या वस्तू, साहित्याची खरेदी केली आहे. 

कोरोना संसर्गवाढीची भीती लोकांमध्ये असून अनेकजण घरापासून जवळ असलेल्या विक्रेत्यांकडे किंवा बाजारपेठेत जाणे पसंत करीत आहेत. अलिकडे साहित्य खरेदी करताना जास्त चोखंदळपणा करण्यापेक्षा उपलब्ध आहे ते साहित्य घेणे महत्त्वाचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राज्यात अनेक ठिकाणी माटोळीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत, लोकही खरेदीला बाहेर पडू लागले असून, आर्थिक गणिते मांडूनच खरेदी केली जात आहे. असे असले तरी आता जवळच्या बाजारपेठा आणि दुकानांतून लोकांची खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. 

तीन दिवसांवर गणेशोत्सव आल्याचे वातावरण तयार झाले असून, त्याशिवाय काही जणांनी पाट तयार करणाऱ्या सुतारांच्‍या वर्कशॉपकडे खरेदीसाठी धाव घेतली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाट, चौरंगांची खरेदीही लोक करीत आहेत. शिवाय ऑनलाईन खरेदीत सर्वकाही उपलब्ध असल्याने अनेकजण या सेवेचाही लाभ घेत आहेत. एकंदर बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भक्तगण कामाला लागला आहे. 

गणेशमूर्ती आणण्‍यास सुरवात
अनेक भक्तांनी गणेशमूर्तीकारांकडून मूर्तीही घरी नेऊन ठेवण्यास सुरवात केली आहे. शाडूच्या मूर्तीचे स्टॉलवाल्यांकडेही अनेकांनी मूर्ती अगाऊ रक्कम देऊन निश्‍चित केल्या आहेत, त्यामुळे ज्यांचे स्टॉल आहेत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे मूर्ती विक्री होईल की नाही, अशी शंका होती. परंतु, बप्पावरील प्रेम पाहता नागरिकांनी बप्पाच्या मूर्तींचे दीड दिवसाचा का होईना पण स्थापना करण्याचे निश्‍चित केले असल्याचे सर्वत्र चित्र दिसते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या