धावेवासीयांनी जपली घुमट आरत्यांची परंपरा

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

घुमट वादनाचा युवकांचा नाद खुळा, सत्तरीत घुमला आरत्यांचा गजर

वाळपई: सत्तरी तालुक्यात अनेक गावात घुमट वादनाच्या सहाय्याने चतुर्थी सणावेळी पुर्वापारपणे चालून आलेली परंपरा बनली आहे. घुमट वादनावर आरती करणे म्हणजे एक वेगळाच आनंद देऊन जातो. सत्तरीतील धावे गावात गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक घुमट वादनाची परंपरा सुरू असून ती परंपरा आजही युवकांनी तसेच वरिष्ठ मंडळींनी जपून ठेवली आहे. वर्षातून एकदा चतुर्थीच्या सणावेळी घुमट वादनावर आरती केल्याशिवाय करमतच नसते. घुमट, झांज, समेळ या त्रिवेणी वादनाच्या माध्यमातून गणपतीची, विविध देवींची, सत्यनारायणाची, विठ्ठलाची अशा अनेक आरत्यांचा नाद या घुमटाच्या वाद्यांवर करणे वेगळाच आनंद व्दिगुणीत करणारा ठरतो. यंदाही धावेवासीयांनी घुमट आरत्या करून आपली परंपरा जोपासली आहे.

सध्याच्या काळात घुमटासोबत पेटीची साथ काही ठिकाणी घेतल्याचे दिसून येते. विशेष करून राज्यातील हौशी तरुण मंडळी घुमट वादनाची एखादी सी. डी. प्रसारीत करतेवेळी पेटी हे वाद्य वाजविले जाते, पण गावात ज्यावेळी आरत्या केल्या जातात, त्यावेळी मात्र घुमट, झांज, समेळ यांचाच वापर केला जातो. धावे गावातील सगळ्याच समाज बंधूंनी आपल्या वाडवडिलांनी सुरू केलेली ही परंपरा जोपासली हे विशेष म्हणावे लागेल. 

आपल्या वरिष्ठांनी बसविलेल्या आरत्यांच्या चालींना वेगळे रूप देऊन चाल न देता. जी आरतीची म्हणण्याची चाल ठरवून दिलेली आहे. त्याच चालीत आरती म्हणण्याचा चांगला पायंडा लोकांनी जपून ठेवला आहे. त्यामुळे घुमटाच्या साथीने या विविध आरत्या म्हणताना मजा ही औरच असते. चतुर्थी म्हटली की घुमट हे वाजवायचेच. 

त्याशिवाय आरत्या नाही व चतुर्थी साजरी केली असे होत नाही. घुमटांचा आवाज ऐकला तरच चतुर्थीत मजा येत असते. चतुर्थी साजरी केली असे दिसते. तसेच सणात नवरंग चढत असतो. यातून धावेवासीयांनी पुर्वापार आरत्या परंपरांचा मौलीक ठेवा जपला आहे. धावे गावातील खूप वर्षांपूर्वी पुर्वजांनी ही परंपरा सुरू केली होती. आजही ती परंपरा कायम ठेवली आहे. धावे गावाबरोबरच आंबेडे, सातोडे, नानोडा, बांबर, नगरगाव, वाळपई अशा अनेक ठिकाणी घुमट आरती केली जाते.

संबंधित बातम्या