यंदा लहान मूर्तीना भाविकांची पसंती

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

मोठ्या गणेशमूर्ती शिल्लक, मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान

नावेली: कोरोना महामारीमुळे यावर्षी भक्तांनी लहान गणेश मूर्तीना जास्त पसंती दर्शवली. तसेच सरकारतर्फेही लहान मूर्तीचा पूजेसाठी वापर करावा, असे  सांगण्यात आले होते. त्यामुळे मूर्तिकारांकडे तयार करण्यात आलेल्या काही मोठ्या मूर्ती शिल्लक राहिल्याने काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

गणपतीमूर्ती चित्रशाळेत मूर्तिकारांनी यावर्षी मूर्ती बनविण्यासाठी बाहेरून मूर्तिकारांना गोव्यात न आणता आल्याने आपण स्वतःच मूर्ती बनविल्या. अनेक  मूर्तिकारांनी पाचशे ते हजार गणपतीच्या मूर्ती आपल्या चित्रशाळेत तयार करतात. यासाठी काहीजण मे महिन्यापासून तर काहीजण जून महिन्यात गणपतीमूर्ती तयार करण्यास सुरुवात करतात.

या गणेशमूर्तीकारांजवळ काही गणेशभक्त एकाच मूर्तिकारांकडून  पिढ्यानपिढ्यानपिढ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सांगतात. त्यामुळे गणेशमूर्ती कारागिरांजवळ त्या गणेश भक्तांची नावे नोंद करून ठेवलेली असतात. गणेशमूर्ती कारागीर वार्षिकपध्दतीप्रमाणे त्या गणेश भक्तांची मूर्ती तयार करून ठेवतात.

कोरोनाचे सावट असल्याने अनेक गणेश भक्तांनी गणपती चित्रशाळेत येऊन आपली गणेश मूर्ती एक  ते दीड  फूट एवढी लहान बनवून देण्याचा आग्रह केल्याने लहान गणेशमूर्ती बनवून देण्यात आल्या अशी माहिती सर्वांगसुंदर गणेशचित्र शाळेचे मालक तुळशीदास नाईक यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात तयार केलेल्या अडीच ते तीन फुटांच्या तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती यंदा तशाच ठेवण्यात आल्या, असे नाईक यांनी सांगितले.

या गणेश मूर्ती न रंगवता तशाच ठेवण्यात आल्या असून सुमारे शंभर ते दीडशे गणेशमूर्ती बनविण्यात आल्या होत्या, असे नाईक यांनी सांगितले. विठ्ठल प्रियोळकर गणपती चित्रशाळेचे मालक सूर्यकांत प्रियोळकर यांनी आपल्या जवळ केवळ १५ ते २० मोठ्या गणेशमूर्ती आहेत, तर बेतूल येथील दत्ता जुवेकर गणेश चित्रशाळेचे संदेश जुवेकर यांनी आपल्या जवळ एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठी मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. नंतर सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमावली लागू केल्याने लहान गणेशमूर्ती तयार करण्यास सांगितले त्यामुळे एकच मोठी गणेशमूर्ती चित्रशाळेत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या