गणेशचतुर्थी: फोंड्यात वरचा बाजार रस्त्यावर ‘माटोळी’

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

आजपासून भरणार माटोळी बाजार, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्‍यता..!

फोंडा: गणेशचतुर्थीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे सावट या उत्सवावर असले तरी खरेदीसाठी आता हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. फोंडा बाजार भाग हा तालुक्‍याबरोबरच इतर तालुक्‍यातील लोकांना खरेदीसाठी उपयुक्त ठरत असल्याने दरवर्षी चतुर्थीच्या सणावेळी माटोळीचे तसेच इतर सामान खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी होते. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गर्दी टाळण्यासाठी माटोळीचा बाजार कुठे भरवायचा, यासंबंधीचे सर्वाधिकार फोंडा पालिकेने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार यंदाचा माटोळीचा बाजार वरचा बाजार भागातील बागायतदारसमोरील रस्त्यावर भरणार आहे. 

यापूर्वी या रस्त्यावर तसेच मार्केटच्या मागे असलेल्या एअरपोर्ट रोडवर माटोळी बाजार भरवला जायचा. पण यंदा एअरपोर्ट रोडवर हा बाजार न भरवता वरचा बाजार भागातील रस्त्यावर पूर्वीप्रमाणे भरवला जाणार आहे.

चतुर्थीचा सण साजरा करताना सरकारने आवश्‍यक निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवावर कडक निर्बंध असल्याने त्याची तयारी फोंड्यातील गणेशोत्सव मंडळांनी आधीपासूनच केली असून सर्वच मंडळांनी दीड दिवसांचा गणेश पूजनाचा निर्णय घेतला आहे. यंदा कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. मात्र घरगुती गणेशोत्सव काही ठिकाणी दीड दिवसांचा तर काही ठिकाणी पाच व सात दिवसांचाही असेल. मात्र बहुतांश लोकांनी दीड दिवसांचा गणेश पूजनाचा निर्णय घेतला आहे. या दीड दिवसांच्या गणेशोत्सवात घरच्या घरी पूजाविधी तसेच आरत्या व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात येतील. तर काही गावांत सामाजिक अंतर राखूनच पुरोहित गणेश पूजा करतील. काही गावात आरत्यांसाठी दहापेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. फोंडा तालुक्‍यातील अनेक गावात आपापल्यापरीने स्वतःच तेथील लोकांनी निर्बंध घातले आहेत. 

यंदा कोरोनामुळे गोव्यातील लाडक्‍या चतुर्थी सणावर बरेच निर्बंध असल्याने लोक हिरमुसले आहेत, मात्र खरेदी सुरूच आहे. 

फोंड्यातील सर्वात मोठी खरेदी विक्री संस्था असलेल्या बागायतदारमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी बागायतदार बाजारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्याबरोबरच सॅनिटायझेशन, मास्क वापरणे तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांना नावनोंदणी करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे बागायतदारमधील खरेदी सुविहित झाल्याचे दिसून आले आहे. 

फोंडा शहर भागात गणेश मूर्ती, मखर सजावटीचे साहित्य, वीज उपकरणे तसेच कडधान्य व इतर सामानाच्या साहित्याने दुकाने गजबजली आहेत. या दुकानांतून खरेदीही चालली आहे, मात्र तेवढी गर्दी नसली तरी येत्या दोन दिवसांत गर्दी वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. गर्दी वाढल्यास कोरोनाचा फैलाव होण्याची भीतीही लोकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने समंजसपणे तसेच संयमाने व खबरदारी घेऊन वागावे, असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

फटाक्‍यांच्या दुकानांना परवानगी
विशेष म्हणजे पर्यावरणपूरक व मर्यादित गणेशोत्सवासंबंधी सरकारपातळीवर ओरड केली जात असली तरी फोंडा तसेच इतर शहरात फटाके विक्रीसाठी दुकाने थाटण्यास खुद्द पालिका, पंचायतींनीच परवानगी दिल्याचे आढळले आहे. दरवर्षी फटाक्‍यांची दुकाने थाटली जातात, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्‍यांवर निर्बंध लादण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली होती. तरीपण राज्यात बहुतांश ठिकाणी फटाक्‍यांची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्याने फटाके उडवण्यासाठी मुलांची व पालकांची गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
 

संबंधित बातम्या