सांताक्रुझमध्ये टोळीयुद्ध, एक ठार

Dainik Gomantak
रविवार, 21 जून 2020

पहाटे केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिस तपासास गती

पणजी

पणजी शहर परिसरात कित्येक वर्षांनंतर टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. २५ वर्षांपूर्वी मेरशी, कालापूर परिसरात टोळीयुद्धे होत असत. त्याची झळ पणजीलाही बसत असे. १९९४ नंतर पणजीचे तत्कालीन आमदार मनोहर पर्रीकर यांनी पोलिस व नागरिक यांच्या मदतीने ही गुंडगिरी मोडून काढली. तेव्हापासून आजवर टोळीयुद्ध मर्यादित स्वरूपात होते आता टोळीयुद्धाने डोके पुन्हा वर काढले आहे.
पणजीलगतच्या सांताक्रुझ भागात आज पहाटे पूर्ववैमनस्यातून टोळीयुद्धाची घटना घडली. सुमारे १० हल्लेखोरांनी गोळ्या झाडत इम्रान बेपारी याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काम्राभाट येथील सोनू सुभाष यादव (वय २५) याचा गोळी लागून मृत्यू झाला. वाहनांवरही गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा हल्ला केला असून सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात जीव गमवावा लागलेला सोनू हा हल्लेखोर टोळीचा भाग होता मात्र त्याला गोळी कशी लागली हे समजू शकले नाही. इम्रानच्या घरातील लोकांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केला मात्र त्यांनी गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे सोनू हा आपल्याच सहकाऱ्यांच्या गोळीबारात ठार झाला असावा, असे मानून पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
कोयते, तलवारी आदींसह हा हल्ला केला गेला असून हल्लेखोरांनी आपले चेहरे झाकले असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हल्लेखोरांनी घराच्या बाहेर असलेल्या दुचाक्यांवर दगड फेकले आणि गाड्यांवर गोळीबार केला. गावठी कट्टा पद्धतीच्या पिस्तुलातून हा गोळीबार केला गेला असण्याची शक्यता आहे. इम्रानच्या समर्थकांनी हल्लेखोरांना पिटाळून लावण्यासाठी बाटल्या फेकल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या परिसरात निरव शांतता असताना हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या त्यातील बहुतांश वाहनांना लागल्या आणि एका गोळीने सोनू यादव याचा वेध घेतला. काही मिनिटातच हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. त्या परिसरातील लोक जागे होऊन घराबाहेर येईपर्यंत तेथे कोणीच नव्हते.सांताक्रुझमध्ये पहाटे झालेल्या टोळीयुद्धात सहभागी झाल्याच्या संशयावर दोन अल्पवयीनांसह नऊ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यापैकी एकाकडून रिवॉल्व्हर जप्त केले आहे. सांताक्रुझ येथील थॉमस कपेलजवळ इम्रान बेपारी याचे घर आहे. त्या घरावर १० जणांनी हा हल्ला केला असून तो सारा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्लेखोरांनी घरासमोर ठेवण्यात आलेल्या वाहनांची नासधूस केली असून त्यांच्यावरही गोळीबार केला आहे. या गोळीबारात सोनू यादव या हल्लेखोरांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्याला गोमेकॉत नेणाऱ्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी पकडले असून त्याला मोबाईलवर सोनू जखमी झाल्याची माहिती कोणी दिली, याची माहिती पोलिस मिळवत आहेत. या प्रकरणातील संशयितांना तत्काळ पकडणाऱ्या पोलिस पथकाला पोलिस महानिरीक्षक जसपालसिंह यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
रायबंदर येथील पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागात पोलिसांनी धरपकड केलेल्यांची चौकशी आरंभली आहे. पोलिस महानिरीक्षक जसपालसिंग या चौकशीवर थेट नजर ठेवून आहेत. या साऱ्याची सुरुवात पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटे अज्ञात व्यक्तीने सांताक्रुझ येथे एका घरावर हल्ला झाला असून काही जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोवर हल्लेखोर पसार झाले होते. त्याच दरम्यान गोमेकॉतील पोलिस चौकीतून बिनतारी संदेश यंत्रणेवर संदेश आला, की गोमेकॉत एक जण मरण पावला असून त्याच्या पोटावर गोळी लागल्याची खूण आहे. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार झाल्याच्या दिशेनेही तपास आरंभला. हल्ल्ल्याला प्रत्युत्तर इम्रान याच्या समर्थकांनी दिले, त्यावेळी त्यांनी गोळीबार केला होता का, याची चाचपणी पोलिसांनी केली. याच दरम्यान हल्ला कसा झाला हे दर्शवणारे सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांना इम्रानच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांपैकी मार्सेलीन यानेच चेहरा झाकला नव्हता, इतरांनी आपले चेहरे झाकून घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मार्सेलीनचा शोध सुरु केला. कुडका बांबोळी येथून त्याला पकडण्यातही आले. त्याच्याकडूनच देशी बनावटीचे रिवॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. इतर हल्लेखोर दूरवर पसार होण्याची शक्यता गृहीत धरून दिवस उजाडण्यापूर्वीच पोलिस पथके स्थापन करून तपासाला गती देण्यात आली. त्यातून दोन्ही बाजूचे मिळून ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर त्यांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. यात गुंतलेले आणखीन कुठे कुठे लपले असतील त्याची शक्याशक्यता अजमावून पोलिसांनी छापा सत्र सुरू करण्याची तयारी रात्री केली होती.

पकडण्यात आलेले संशयित असे
मार्सेलिनो डायस, वय ३३, कुडका बांबोळी
रॉनी डिसोझा वय २३, सांतिनेज पणजी
सॅम्युएल डिसोझा, वय २०, सांतिनेज पणजी
डेव्हीडआरावजो वय २६, सांताक्रुझ
मिंगेल आरावजो वय १९ सांताक्रुझ
फ्रांसिस फ्रॅंकी नादाल वय २३ सांताक्रुझ
डेव्हीड डिसोझा वय २०, काम्राभाट पणजी

सहा महिन्यांपूर्वी झाला होता हल्ला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी हल्ला करण्यात आला होता, मात्र त्याची माहिती सार्वत्रिक झाली नव्हती. टोळीयुद्धाचा तो प्रकार असल्यामुळे बेपारी यानेही पोलिसात तक्रार केली नव्हती. आता कोविड महामारीच्या काळात रात्री संचारबंदी असताना मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात. खुलेपणाने एखाद्याच्या निवासस्थानावर गोळीबार होतात आणि परागंदा होतात. पोलिस गस्त असूनही ते पकडले जात नाहीत, असे का झाले असावे याची चर्चा सुरू झाली आहे. सांताक्रुझ परिसरात एकच टोळी पूर्वी होती. त्यात फूट पडली. पैसा आणि हद्द यावरून दोन्ही टोळ्यांत वाद झाला त्याची परिणती काल गोळीबारात झाली.

खंडणीतून टोळीयुद्ध भडकले
बेपारी याने त्या टोळीतील एकावर हल्ला केली होता. त्याप्रकऱणात त्याला पोलिसांनी पकडलेही होते. मात्र कोठडीतून बाहेर आल्यावर त्याने आपली टोळी तयार केली. तिसवाडी तालुक्यावर बेपारीने आपली पकड बसवली होती. छोटे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, फळ विक्रेते, पर्यटक मार्गदर्शक, कुंटणखाना चालवणारे आदींकडून मिळणारा खंडणीरुपी पैशावरून वाद होत असत अशी माहिती सुत्रांनी दिली. पणजीसह जुनेगोवे, मेरशी, मिरामार आणि ताळगाव परिसरात या टोळ्यांची दहशत आहे. किनारी भागातही अनेक टोळ्या असल्या तरी अर्थकारणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग मानला जातो.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा केली जात असताना पोलिसांना त्याची साधी कल्पनाही नसावी याचेच आश्चर्य आज व्यक्त करण्यात येत होते.

तेव्हा दखल घेतली असती तर
बेपारी याने एका टोळीतील सदस्यावर हल्ला केल्यानंतर बेपारी याचे छायाचित्र समाज माध्यमावर फिरवून त्याला संपवण्यात येणार असल्याचे म्हटले होते अशी माहिती आता उघड होऊ लागली आहे. पोलिसांनी त्याची तेव्हाच दखल घेतली असती तर कालचा हल्ला टाळता आला असता वा गुंडगिरीचा बिमोड करता आला असता अशी चर्चा लोकांत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी जुनेगोवेत
पोलिस महानिरीक्षक जसपालसिंग यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज जुनेगोवे पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन करून तपासास लागलीच गती देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची धरपकड सुरू केली असून येते काही दिवस हल्लेखोर दडून बसले तर कुठे दडतील याचा अंदाज घेत शोध मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या राज्याच्या सीमांवर अहोरात्र पोलिस पहारा असल्याने हल्लेखोर राज्यातच दडून बसले असावेत हे हेरून तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या