वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे: तळपण किनाऱ्यावरील भक्तांना पावणारे गणपती मंदिर

सुभाष महाले
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

तळपण नदीच्या मुखावर श्री गणपतीचे पुरातन मंदिर आहे. तळपण किनाऱ्यावरील ‘गणपती मंदिर’ येथील गाबीत मच्छीमार समाजाबरोबर अन्य समाजाचे श्रद्धास्थान आहे.

काणकोण: तळपण नदीच्या मुखावर श्री गणपतीचे पुरातन मंदिर आहे. तळपण किनाऱ्यावरील ‘गणपती मंदिर’ येथील गाबीत मच्छीमार समाजाबरोबर अन्य समाजाचे श्रद्धास्थान आहे. हे देवालय पूर्वाभिमुख असून देवालयाच्या पार्श्वभागात अथांग अरबी समुद्र आहे. भक्तांना पावणारा गणेश अशी या मंदिराची ख्याती आहे.

हे मंदिर पुरातन असून पूर्वी या मंदिरात श्री गणपतीचा लाकडी मुखवटा होता. आता गणपतीची संगमरवरी मूर्ती बसवण्यात आली आहे. त्याशिवाय धातूची उत्सव मूर्ती आहे. वेगवेगळ्या उत्सव प्रसंगी पालखीतून या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. 

श्री गजाननाचा प्रत्येक उत्सव या देवालयात साजरा करण्यात येतो. गणेश जयंतीदिनी या देवालयाचा वर्धापनदिन धुमधडाक्यात वेगवेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. त्याशिवाय प्रत्येक मंगळवारी याठिकाणी श्री गणपतीची विशेष पुजा असते. विनायकी, संकष्टी या दिवशीही विशेष पुजा व स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम असतो. उत्साहाच्या दिवसांत संपूर्ण वाडा शाकाहारी असतो. देवालयासाठी श्री सवाई वीर सदाशिव राजेंद्र बसवलिंग राजे वडियार सौंदेकर राजे यांनी ७८३ चौरस मीटर जमीन दिली होती. त्याच जागेवर या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या देवालय समितीच्या अध्यक्षपदी अनिल जोशी आहेत, असे देवालयाचे एक ज्येष्ठ सदस्य दिगंबर चोपडेकर यांनी सांगितले. 

या देवालयाच्या बांधणीत अनेकांनी आर्थिक मदत दिली आहे. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी ही मदत केली आहे. त्याशिवाय दिगंबर चोपडेकर यांनी आपल्या माता- पिता यांच्या स्मरणार्थ बांधकामात अर्थसहाय्य केले आहे. या देवालयाची स्थापना नक्की केव्हा केली याचा तपशील जरी नसला तरी देवालयात पूर्वी श्री गणेशाच्या लाकडी मुखवटा घुमटीत पुजण्यात येत होता. आजही हा गणेशाचा लाकडी मुखवटा या देवालयात आहे. पैंगीण पंचक्रोशीतील हे एक गणेशाचे मंदिर असून विनायकी व संकष्टीला या ठिकाणी भाविक श्री गणेशाचे दर्शन या ठिकाणी घेत असतात.

संबंधित बातम्या