
सत्तरीतील केरी, मोर्ले, पर्ये भागातून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या वाळवंटी नदीचे डोह आंघोळीसाठी गजबतात. पण या तिरांवर तरुणाईकडून दारूच्या नशेत दंगामस्ती होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने वाळवंटी नदीचे तीर विद्रूप बनत चालले आहेत.
मोर्ले-केरी भागातील या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने लोक येत असल्याने त्याचा नाहक त्रास स्थानिकांना होतो.
पेळावदे-मोर्ले येथे असलेल्या ‘उभो गुणो’ या डोहाकडे येताना मोरजकरवाडा येथे रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी भर रस्त्यात उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच वेगाने गाड्या हाकल्याने स्थानिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत उकाडा असह्य होत असल्याने सत्तरी आणि राज्याच्या विविध भागांतून कुटुंबे आणि तरुणांचे गट मोर्ले, केरी, पर्ये आदी भागातील वाळवंटी नदीच्या डोहात पोहणे आणि आंघोळीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
दिवसाचा बेत आखून येणारे हे पर्यटक येताना चिकन-मटण-माशांसहित खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊन येतात. त्याचबरोबर थंडपेये आणि बहुतेकजण दारू, बियर अशी मद्यपेये आणतात.
नदीत आंघोळी करणे आणि तीरावर बसून खाणे-पिणे हा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रकारामुळे नदीचे तीरांवर कचरा पसरलेला पाहायला मिळतो.
दोन आठवड्यांपूर्वी घोटेली १ येथील कळस कोंड या वाळवंटी नदीडोहात एक शाळकरी बुडून मृत्युमुखी पडल्याने इथले डोह आंघोळीसाठी धोकादायक असल्याचे चित्र समोर आले होते.
एक तर इथल्या नदीचे डोह खोल असल्याने आणि दुसऱ्या बाजूने दारूच्या नशेत आंघोळ करणारे तरुण बुडण्याचा धोका आहे, त्यामुळे संबंधित यंत्रणेने यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी होत आहे.
संगीत रजनीवर धिंगाणा
या नदीकिनारी येणारे तरुणांचे गट संगीताच्या तालावर मौजमजा आणि दंगामस्ती करतात. बऱ्याच वेळा एकापेक्षा अधिक गट असे प्रकार करीत असल्याने त्यांच्यामध्ये वादावादी होते. त्यामुळे हे किनारे भविष्यात दंगामस्ती करणाऱ्यांची केंद्रे होण्याची भीती आहे.
कचऱ्याचा खच वाढला
नदीतीरावर पर्यटक प्लास्टिक कचरा, बाटल्या किंवा दारूच्या बाटल्या तिथेच टाकून जातात त्यामुळे तेथे कचऱ्याचा खच वाढत चालला आहे. असा कचरा सर्वत्र पसरत असल्याने नदी तीरांवर दुर्गंधी पसरलेली आहे. मोर्ले-पेळावदे येथील तीरावर कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे.
बाहेरच्यांना आळा घाला
मोर्ले-पेळावदे येथे असलेल्या ‘उभो गुणो’ या वाळवंटी नदीच्या डोहाकडे सर्वात जास्त दंगामस्ती पाहायला मिळते. त्याचा नाहक त्रास आम्हाला होतो. या डोहात बाहेरील लोकांवर मर्यादा आणाव्यात आणि या डोहाचे सौंदर्य शाबूत ठेवावे, अशी मागणी रेश्मा मोरजकर यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.