मुरगाव पालिका क्षेत्रात कचऱ्याचे ढीग!

Vasco garbege
Vasco garbege

मुरगाव
मुरगाव पालिका क्षेत्र चिखली आदर्शनगर ते सडापर्यंत एकूण २५ प्रभागात विभागले आहे. पालिकेने गेल्या सहा वर्षांपासून घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असले, तरी विविध प्रभागात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत. वास्को शहर परिसरात तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. खारवीवाडा, मांगोरहिल, नवेवाडे, वाडे, बायणा, बोगदा, जेटी, सडा, एमपीटी कॉलनी या ठिकाणी कचरा रस्ता किंवा मोकळ्या जागेत साठविल्याचे विदारक चित्र आहे. या कचऱ्यावर मोकाट गुरांचा कळप चरत असल्याने कचरा सर्वत्र विखुरलेला असतो.
मुरगाव पालिकेने कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच डार्क स्पॉटचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते, पण ही योजना लाल फितीत बंद करून ठेवल्याने जिथे तिथे कचराच कचरा असा प्रकार आढळून येत आहे.
भारत स्वच्छ अभियानाचे वास्कोत तीन तेरा वाजले आहे. कोणीच या अभियानाची पूर्तता मुरगाव पालिका क्षेत्रात करताना दिसून येत नाही. शहरात दारोदारी कचरा उचलण्याचे काम चालू आहे, पण उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. काही दुकाने, हॉटेल यांच्याकडील कचरा गोळा केला जात नाही अशीही माहिती मिळाली आहे. पालिकेला कोणी आव्हान दिल्यास त्यांच्या कचऱ्याची उचल करू नये असा अलिखित नियम साफसफाई विभागाला घालून दिला आहे. त्याचा अनेकांना फटका बसला आहे. वास्को शहरात तळावलीकर हॉस्पिटल परिसर, नियोजित सिग्नेचर प्रकल्प परिसर, भाजी मार्केट परिसर या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहर नगरसेवक दाजी साळकर यांनी काही ठिकाणचे डार्क स्पॉट सुशोभित केल्याने उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची मात्रा काही प्रमाणात कमी झाली आहे, पण वरील परिसर उघड्यावरील कचऱ्याने व्यापलेला असून त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे.
मुरगाव पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात साठवून ठेवलेल्या कचऱ्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीमय वातावरणात जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची बरीच शक्यता निर्माण झाली आहे. सध्या वास्को परिसरातील जनता कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने भीतीच्या सावटाखाली दबून गेलेले आहेत. त्यातच पालिकेच्या साफसफाई कामगारांच्या आडमुठ्या धोरणामुळे आजार फोफावण्याची भीती पसरली आहे.
मुरगाव पालिकेने ठिकठिकाणी निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढीगांची विल्हेवाट लावण्याच्या बाबतीत डोळेझाक केल्यास परिस्थिती भयानक होईल अशी चिन्हे दिसत आहेत. पालिकेचा साफसफाई विभाग तांत्रिक विभागाकडून हाताळला जातो. या विभागाचे जबाबदार अधिकारी हाताची घडी घालून गप्प बसलेले आहेत. कुणाचाच पायपोस कुणाला नाही अशी अवस्था पालिकेची झाली आहे. कोरोना विषाणूमुळे सफाई कामगार अनेक प्रभागात सफाईची कामे करण्यास घाबरत आहेत अशी तक्रार आहे. सफाई कामगारांना हातमोजे, गमबूट, रेनकोट द्यावा अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे, पण त्याची पूर्तता केली जात नाही.
पालिका कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन वेळेत मिळाले नसल्याने कामगारांनी अडीच दिवस संप केला. त्यामुळे दैनंदिन कचऱ्याची उचल झाली नाही. बुधवारी वेतन मिळाल्यावर कर्मचारी कामावर रुजू झाले. सफाई कामगारांनी कचरा उचल जोमाने सुरू केली असली, तरी अनेक प्रभागात कचऱ्याचे अजून ढीग साठलेले आहेत. एकूण मुरगाव पालिका साफसफाईची कामे करण्याच्या बाबतीत बरीच मागे आहे. त्यामुळेच पालिका क्षेत्रात पावलोपावली कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडत आहेत.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com