मुरगाव पालिकेची ‘डार्क स्पॉट’ सुशोभीकरण योजना लालफितीत बंद

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

मुरगाव पालिकेच्या साफसफाई कामगारांनी पालिका क्षेत्रातील साफसफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. परिणामी पावलोपावली पालिका हद्दीत कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात.

मुरगाव: मुरगाव पालिकेच्या साफसफाई कामगारांनी पालिका क्षेत्रातील साफसफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. परिणामी पावलोपावली पालिका हद्दीत कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. याविषयी लोकांनी तक्रार करूनसुद्धा अधिकारी वर्ग चीडीचूप आहेत. मुरगाव पालिका क्षेत्र चिखली आदर्शनगर ते सडापर्यंत एकूण २५ प्रभागात विभागले आहे. पालिकेने गेल्या सहा वर्षांपासून घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असले तरी, विविध प्रभागात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहे.

वास्को शहर परिसरात तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. खारवीवाडा, मांगोरहिल, नवेवाडे, वाडे, बायणा, बोगदा, जेटी, सडा, एमपीटी कॉलनी या ठिकाणी कचरा रस्ता किंवा मोकळ्या जागेत उघड्यावर पसरल्याचे विदारक चित्र आहे. या कचऱ्यावर मोकाट गुरांचा कळप चरत असल्याने कचरा सर्वत्र विखुरलेला असतो.

मुरगाव पालिकेने कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच ‘डार्क स्पॉट’चे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते, पण ही योजना लाल फितीत बंद करून ठेवल्याने जिथे जावो तिथे कचराच कचरा असा प्रकार आढळून येत आहे.

भारत स्वच्छ अभियानाचे वास्कोत तीनतेरा वाजले आहेत. कोणीच या अभियानाची पूर्तता मुरगाव पालिका क्षेत्रात करताना दिसून येत नाही. शहरात दारोदारी कचरा उचलण्याचेही काम बंद आहे. त्यामुळे नाईलाजाने लोकांना उघड्यावरच कचरा टाकावा लागत आहे. काही दुकाने, हॉटेल यांच्याकडून कचरा गोळा केला जात नाही अशीही माहिती मिळाली आहे. पालिकेला कोणी आव्हान दिल्यास त्यांच्या कचऱ्याची उचल  केली जात नाही.

मुरगाव पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात साठवून ठेवलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची बरीच शक्यता निर्माण झाली आहे. सध्या वास्को परिसरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली दबून गेलेले आहे. त्यातच पालिकेच्या साफसफाई कामगारांच्या आडमुठ्या धोरणामुळे अन्य आजार फोफावण्याची भीती पसरली आहे.

मुरगाव पालिकेने ठिकठिकाणी निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढीगांची विल्हेवाट करण्याच्या बाबतीत डोळेझाक केल्यास परिस्थिती भयानक होईल अशी चिन्हे दिसत आहे. पालिकेचा साफसफाई विभाग तांत्रिक विभागाकडून हाताळला जातो. या विभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टरसुद्धा हाताची घडी घालून गप्प बसलेले आहेत. कुणाचाच पायपोस कुणाला नाही अशी अवस्था पालिकेची झाली आहे. कोरोना विषाणूमुळे सफाई कामगार अनेक प्रभागात सफाईची कामे करण्यास घाबरत आहेत अशी तक्रार आहे. सफाई कामगारांना हातमोजे, गमबूट, झाडू, टोपल्या दिल्या जात नाही, अशी सफाई कामगारांची तक्रार आहे. एकूणच मुरगाव पालिका साफसफाईची कामे करण्याच्या बाबतीत बरीच मागे आहे. त्यामुळेच पालिका क्षेत्रात पावलोपावली कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडत आहेत.

संबंधित बातम्या