माणूस होण्याविषयी...

गौरी भालचंद्र
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

खरं तर आयुष्यातील सुख आणि दु:ख यांची निवड करण्याचा आपल्याला कधीच पर्याय विचारला जात नाही..आपण फक्त त्या अपरिहार्य दोघांना सारख्याच आपुलकीने स्वीकारले पाहिजे... 

आयुष्यात मोठा माणूस होण्याविषयी लहानपणापासून बाळकडू मिळत आलेले असतात.लहान वयात आपल्याला समज तर नसतेच आणि उमज तरी कुठे असते..आपण फक्त वडीलधाऱ्या आज्ञा शिरसावंद मानून त्याच्या पूर्तीसाठी डोळे मिटून धावत सुटतो..

मोठेपणाचे असे काही विलोभनीय चित्र आल्याभोवती उभे केलेले असते की आपण कसलाही सारासार विचार न करता सचोटीच्या, नीतीच्या, ईमानाच्या, माणुसकीच्या धर्माच्या लक्ष्मणरेषा ओंलांडून त्या मोठेपणाच्या प्राप्तीसाठी धावत सुटतो... नि आपसूकच स्वत:ला अशोकवनाच्या कैदेत नेऊन सोडतो... मोठा माणूस होण्याच्या हव्यासात आपण  इतके वहावत जातो की एक वेळ अशी येते कि आपल्याला मोठेपण मिळते पण त्यात माणूस असत नाही..

आपण या लढाईत एक गोष्ट विसरतो की सृष्टीच्या नजरेत माणूस हा माणूस असतो...त्याची मोठा-छोटा अशी वर्गवारी करण्यासाठी आपण वापरत असलेली परिमाणे ही आपली व्युत्पत्ती आहे... ती अनैसर्गिक आहे.माणसाचा मोठेपणा अथवा छोटेपणा हा त्याच्या सांपत्तिक स्थितीवरून वा समाजातील प्रतिष्ठेवरून ठरविण्याचा आपला रिवाज संपूर्णत: टाकाऊ आहे हे आपण कधीच मान्य करत नाही..

प्रत्येक माणसाच्या आयुष्याला law of conservation of  सुख आणि दु:ख तंतोतंत लागू पडत असतो..  आपण सुख आणि दु:ख निर्माण ही करू शकत नाही आणि नाहीसेही करू शकत नाही... जे जे काही आपण सुख दु:ख म्हणून गोंजारत असतो ते ते सारे आपले आपणच निर्माण केलेले भ्रम असतात..या भ्रमाची स्वप्ने आपल्याला जागेपणी पडलेली असतात..

आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते..जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते..पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.. दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.. आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.

लहानपण हे निरागस ,निरपेक्ष ,निर्व्याज आणि निर्मोही असते...मागणी तसा पुरवठा हा सिद्धांत प्रत्यक्षात आला...शाळेत असताना पाटीवरील रेघोट्यांमध्ये सारा आसमंत दडून जायचा .... मोठेपणी आकाशाच्या भिंती करून आपापले अंगण  मात्र विकावयास काढले जाते... काय कळत नाही कधी कधी विचार केला तर काय...

हेही वाचा : सिनेमा - एक परिणामकारक माध्यम

त्या स्वप्नांच्या खुशालीत मोठेपणा आपल्याला शेवटपर्यंत वाकुल्या दाखवीत रहातो..आपण लहानपणापासून हा दरवेशाचा खेळ बघता बघता आपली करमणूक करून घेत आलो आणि कधी जमुरे म्हणून त्या माकडाने हाक मारताच आपणही माकड होऊन त्याला प्रतिसाद देत गेलो हे आपल्याला आठवत नाही..आणि मग आपल्याला घालण्यात आलेल्या राजपुत्राच्या कपड्यात आपण खरोखरच राजे होऊन गेल्यासारखे मिरवीत सुटतो..

खरं तर आयुष्यातील सुख आणि दु:ख यांची निवड करण्याचा आपल्याला कधीच पर्याय विचारला जात नाही..आपण फक्त त्या अपरिहार्य दोघांना सारख्याच आपुलकीने स्वीकारले पाहिजे... मोठेपणा हा सुखात आणि दु:खात जास्त, कमी असा काही मोजदाद करण्याचा मुळी मामलाच नाही.. मोठेपणा आहे माणूसपण जपण्यात.. लहानपण कुरवाळण्यात... अकाली प्रौढपणा घेण्यात... अवघे आकाश पांघरण्यात...इवलूशी नाती जपण्यात... स्पर्शाचे हुंदके टिपण्यात... स्वप्नांच्या सांजवातीस सोबत करण्यात. .काळोखाच्या रातीस चांदण्या होण्यात.

संबंधित बातम्या